
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही शिक्षा भोगीन, असं खुलं आव्हान ग्रामविकास मंत्री व केडीसीसी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिले. यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाल्याची टीकाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली आहे.मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती आधी घ्यायला हवी होती. ही माहिती घेऊन त्यांनी आंदोलन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात न येता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेली नाही, तिकडे हे आंदोलन करायला हवे होते. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन बँकांसमोर करण्याचा निर्णय भाजपने घेतला असताना कोल्हापुरात मात्र हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यावरूनच त्यांच्यावर ओढलेली नामुष्की आणि त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाची हवाच गेल्याचे स्पष्ट होते. केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाही शेतकऱ्यांना कर्ज देत आहेत .मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समन्वय समितीने केडीसीसी बँकेला २०२०-२०२१ या शेती हंगामासाठी एकूण खरीप इष्टांक ६८६ कोटी दिलेला आहे. प्रत्यक्षात केडीडीसी बँकेने १०८२ कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या ही टक्केवारी १५८ टक्के आहे. पीककर्ज वाटपात केडीसीसी बँक राज्यात अव्वल असल्याकडेही मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष वेधले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचे पैसे न येऊनसुद्धा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply