भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने वाढीव वीजबिलाबद्दल निवेदन

 

कोल्हापूर: संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात धुमाकूळ घालू लागला. देशाचे पतंप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० पासून एक महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला. विदयमान महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक पाऊले उचलली यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मार्च, एप्रिल व मे या महिन्याची लाईट बिले नंतर भरण्याची मुभा दिली परंतु जून महिन्यामध्ये अचानक महावितरण कंपनीने वीज बिलांचा ४४० व्होल्टचा झटका सर्वसामान्य नागरिकांना दिला. असंख्य ग्राहकांना आवाच्या सव्वा दराने वीज बिले आली. महावितरण कंपनीने ई-सेवेद्वारे ग्राहकाच्या मोबाईलवरून वीज बिल भरण्याचे आवाहन केले होते त्यामुळे कोल्हापूर शहरातील असंख्य ग्राहकांनी वीज बिले भरावयास सुरुवात केली होती. वर नमूद केल्याप्रमाणे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांची वीज बिले असंख्य ग्राहकांनी ई-सेवेच्या माध्यमातून भरली परंतु जून महिन्यामध्ये वीज बिले हातात पडल्यावर सर्वसामान्य ग्राहकांची मती गुंग झाली कारण या बिलामध्ये मागील तीन महिन्याची बिले भरून देखील त्याची कोणतीच नोंद त्यात नव्हती या संदर्भात महावितरणच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. सरकारकडे मागणी केल्या प्रमाणे ३०० युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे. या मागणीचा भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने पुर्नउच्चार करण्यात आला. महावितरण कंपनीच्या वतीने वाढीव वीज बिले, विजेचा लपंडाव, ग्राहकांशी चुकीची वर्तवणूक ई. मुळे लोकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबतचे निवेदन आज भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील यांना देण्यात आले.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!