बेड अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले चार महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश आले असताना, गेल्या दहा दिवसातच रुग्णांची संख्या हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यातच काल बेड अभावी कोरोना रुग्णाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड होत आहे. अशाप्रकारे उपचाराअभावी आजतागायत तीन रुग्ण दगावले असून, या रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, राज्य शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेवूनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना कडक सूचना द्या, होम क्वॉरंटाईनचे बनावट शिक्के मारणाऱ्या सीपीआर मधील टोळीवर कारवाई करा, आदी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर प्रशासनास दिल्या. बेड अभावी कोरोना रुग्णाचा झालेला मृत्यू आणि सीपीआर रुग्णालयातील कारभार आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सीपीआर रुग्णालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
            बैठकीच्या सुरवातीसच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, सीपीआर रुग्णालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा योग्य रीतीने सांभाळण्यात येत आहे. पण, दि.२३ रोजी बेड शिल्लक नाही म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णाला कसे काय सांगितले जाते? शिल्लक नसल्यास त्या रुग्णास इतर रुग्णालयात का दाखल करून उपचार करण्यात आले नाही, असा प्रश्नांचा भडीमार करीत रुग्ण दगावला त्या दिवशी आठ बेड शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोल्हापुरातील परिस्थिती चांगली होती परंतु स्थलांतरीत लोकांना परस्पर बनावट होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून तपासणी न करताच घरी पाठविण्यात आले. त्याचमुळे कोल्हापुरात रुग्णांची संख्या वाढली गेली. बनावट शिक्के मारणाऱ्या दलालांच्या या टोळीवर कडक कारवाई करण्यात यावी. याचबरोबर शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेची कोरोना बाबतची नियमावली काही खाजगी रुग्णालयांकडून वेशीवर टांगण्यात आली आहे. सीपीआरमधून रुग्ण पळवणारी टोळी कोरोना पेशंटवर उपचार करण्यास का पुढे येत नाही? महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयांना कोणती नियमावली आखून देण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार कोणते रुग्णालय अमलबजावणी करतात आणि कोणते करत नाहीत याचा अहवाल द्या, जे रुग्णालय शासनाची नियमावली पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. रुग्णालयांनी आपली जबाबदारी सांभाळावी, प्रशासनानेही नागरिकांसाठी जनआरोग्य योजनेतून मंजूर होणाऱ्या कोरोनाचे पॅकेजची माहिती जाहीर करावी. रुग्णांच्या आयुष्याशी खेळू नये, कोणत्याही रुग्णाला उपचारात कुचराई होता कामा नये. रुग्णालयाच्या काही समस्या असतील तर त्यांची तातडीची बैठक घेवून समस्यांचे निराकरण करावे, अशा सूचना दिल्या.
           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!