
कोल्हापूर : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत. या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दिल्ली सरकारने केलेल्या उपाययोजनेच्या धर्तीवर अंशता आणि मध्यम कोरोनाग्रस्त रुग्णावर घरीच उपचार करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवेची यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. शासनाच्या निधीतून रुग्णांना महापालिका प्रशासनातर्फे ऑक्सिमीटर उपलब्ध करून द्यावे, प्रकृती अत्यंत गंभीर असल्यासच रुग्णालयात दाखल करण्याबाबत अत्यावश्यक सेवेची यंत्रणा राबवावी. सीपीआर मध्ये होम क्वारंटाईनचे बनावट शिक्के मारणारी टोळीच शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यास जबाबदार असून, आयुक्त या नात्याने त्या टोळीची चोकशी करून दोषींवर गुन्हे नोंद करावेत. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. सेवा म्हणून काम करणाऱ्या रुग्णालयांचे अभिनंदनच पण, कोरोना रुग्णांची लुट करणाऱ्या काही रुग्णालयांवर कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेस आक्रमक भूमिका घेणे भाग पाडले, असा इशारा देत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.मल्लिनाथ कलशेट्टी यांना सुचना दिल्या. यासह कोरोना महामारीवर मात करावयाची असल्यास, रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयास आणि प्रशासनास शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, अलगीकरण केंद्रात नागरिकांना योग्य सुविधा द्याव्यात, महापालिका रुग्णालयांचा दर्जा सुधारून आरोग्य विभागाची यंत्रणा सक्षम करावी आदी विषयांवर राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्ठमंडळाची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमवेत आज महापालिका निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क येथे बैठक पार पडली. राजेश क्षीरसागर यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर उपाय सुचविताना, कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर नागरिकांनी घाबरून जावू नये. प्रथम आपली स्वॅब तपासणी करावी. रिपोर्ट पॉझीटीव्ह आला तरी संबधित नागरिकाने न घाबरता स्वत:ला घरीच क्वारंटाईन करावे आणि इतरांशी संपर्क टाळावा यासह त्याची माहिती तातडीने प्रशासनाच्या अत्यावश्यक सेवा यंत्रणेस द्यावी. सदर अत्यावश्यक सेवेच्या यंत्रणेने तात्काळ त्या नागरिकाची घरी जावून तपासणी करावी. सदर रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यासच त्याला रुग्णालयात दाखल करावे अन्यथा घरीच त्यांच्यावर उपचार करावेत. त्याला घरीच स्वतंत्रपणे क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यासह कुटुंबियांना घ्यावयाच्या काळजी व उपाययोजनांची सविस्तर माहिती द्यावी. यासह अत्यावश्यक सेवेतील यंत्रणेने संबधित रुग्णाची पुढील १४ दिवस दिवसातून दोनवेळा माहिती घ्यावी. यासह अत्यावश्यक सेवेचा नंबर त्यास संपर्कासाठी द्यावा. जेणेकरून त्या रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करणे सोपस्कर होईल. घरीच उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांना शासनाकडून मंजूर झालेल्या कोरोनासाठीच्या निधीतून महानगरपालिकेच्यावतीने ऑक्सिमीटर उपलब्ध करून द्यावे. कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होत असल्याने सदर रुग्णाची ऑक्सिजनची मात्रा योग्य आहे कि नाही हे या मशीनद्वारे रुग्णास समजेल. रुग्नानेही दिवसातून प्रत्येक तासाला आपली ऑक्सिजनची मात्रा तपासावी. जर ऑक्सिजन मात्रा कमी वाटल्यास रुग्णाने तात्काळ अत्यावश्यक सेवेशी संपर्क साधावा आणि प्रशासनानेही त्वरित त्याला रुग्णालयात दाखल करावे. त्यामुळे अंशता व मध्यम कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी ही उपचार पद्धती प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे यंत्रणेवरील ताणही कमी होणार असून, उपचाराअभावी कोणताही रुग्ण न राहता अतिगंभीर रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने तातडीने घरीच उपचार करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा राबवावी अशी मागणी प्रामुख्याने केली.
Leave a Reply