राम मंदिरासाठी ३३ वर्षांपूर्वीच सव्वा किलो चांदीची वीट पाठविण्यात आली होती

 

बाबरी मशिदीच्या पतनानंतर अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी राज्यातील पहिली चांदीची वीट ३३ वर्षांपूर्वी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी पाठविली होती. टेंभीनाका परिसरातील व्यापारी आणि जनसहभागातून लोकवर्गणी आणि चांदी गोळा करून दिघे यांनी ‘श्री रामचंद्र’ असे लिहिलेली ही सव्वा किलो वजनाची वीट खास कारागिरांकडून तयार केली होती. याबाबतच्या आठवणी ही वीट तयार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कनूभाई, उत्तम सोळंकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जागविल्या.
अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर व्हावे, यासाठी आनंद दिघे प्रचंड आग्रही होते. अयोध्येत बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर त्यांनी लगेच ठाण्यातील व्यापारी आणि शिवसैनिकांसह प्रतिष्ठित लोकांसोबत ही वीट निर्माण केली.
यासाठी चंदनवाडी गणेशोत्सवातही रामजन्मभूमीवर देखावा तयार केला होता कॅसेट तयार केल्या होत्या. यावर पोलिसांनी बंदी आणूनही त्यांनी शिवसैनिकांच्या माध्यमातून लपूनछपून रामजन्मभूमीचा प्रसार केला होता, असे शिवसैनिकांनी सांगितले.
येथे १०१ फुटांचा कटआउटही लावला होता. राम मंदिरासाठी दिघे १९८७ पासूनच आग्रही होते. कारसेवेला गेले म्हणून दिघेंवर गुन्हाही दाखल झाला होता, असेही शिवसैनिकांनी सांगितले.वीट तयार केल्यानंतर खबरदारी म्हणून साध्या विटेला चांदीचा वर्ख लावून दुसरी एक आणखी वीट तयार केली होती. सव्वा किलोची ती चांदीची वीट भाविकांच्या दर्शनासाठी नवरात्रीत आठ दिवस ठेवली होती, याचीही आठवण शिवसैनिकांनी यावेळी सांगितली. आता ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास होत असल्याने ही वीट तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे शिवसैनिक आणि व्यापार्यांत प्रचंड उत्साह संचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!