आज जागतिक वडा पाव दिनानिमित्ताने वडा पाव चा प्रवास

 

आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. मात्र या वडापावचा जन्म नक्की कुठे झाला. तो आजच्या मॅक-डोनाल्ड्सपासून ते शेजवान वडापाव, स्वीटकॉर्न वडापावपर्यंत कसा आलाय हे जाणून घेऊयात या खास लेखामध्ये…
जन्म…
१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.

सुरुवातीचा काळ…
वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले.

रोजगाराचे साधन आणि राजकीय पाठिंबा…
१९७० ते १९८० च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसाने उद्योगात उतरावे या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!