
कोल्हापूर:कोरोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्याने केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन नंतर समान्य नागरीकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता केंद्र शासनाने विविध आर्थिक पॅकेजे ची घोषणा केली. यामध्ये हातावर पोट असणार्या फेरीवाल्यांकरीता पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत बँकांमार्फत रू.१०००० तातडीने कर्ज देण्याची योजनाही आहे. या योजनेची सुरूवात जुलै २०२० मध्ये झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्र फेरीवाल्यांना हे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत विविध बँका टाळाटाळ करत असल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहूल माने यांना भेटून निवेदन दिले.
यावेळी बोलताना भाजपा गटनेते अजित ठाणेकर म्हणाले, कोल्हापूर शहरात सुमारे ८ हजार नोंदणीकृत फेरीवाले असून आजपावेतो त्यांच्यापैकी २३२५ इतक्या फेरीवाल्यांनी या योजनेत अर्ज केले असून त्यापैकी ८४० अर्ज मंजूर तर केवळ ३५९ फेरीवाल्यांना कर्ज पुरवठा झाला आहे. इतर जिल्ह्यात या कर्ज वाटपाचे काम खूपच गतीने चालले असून कोल्हापूरात मात्र याबाबत बॅक अधिकार्यांत अनास्था दिसून येत आहे. शासनाने सर्वसामान्यांसाठी लागू केलेल्या योजना जर बँक अधिकार्यांच्या दिरंगाईमुळे सामान्यांपर्यंत पोहोचत नसतील तर ही गंभीर आणि संतापजनक बाब आहे.
भाजपा जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, कोल्हापूर शहरात ज्यांचे कर्ज मंजूर झाले आहे त्यांच्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बाबत सर्वाधिक तक्रारी आहेत. कर्ज मंजूर झालेली व्यक्ती या बँकेच्या कोणत्याही शाखेत गेल्यास आमचेकडे नाव आलेले नाही असे सांगितले जाते आहे, एका बँके कडून कर्ज मंजूर झालेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे आणण्यासाठी वारंवार परत पाठवले जात आहे. त्यामुळे काही लोकांनी कर्ज नको असे सांगितल्याचे कळते.
एका व्यक्तीस एका बँकेतून एक फॉर्म दिला गेला व तो हिंदीत भरून आणा असे सांगितले. या योजनेचे सर्व कामकाज ऑनलाईन असताना पुन्हा फॉर्म भरून घेण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. स्टेट बँक ऑफ इंडीया च्या उद्यमनगर ब्रँच मध्ये एका फेरीवाल्यास आमचेकडे केवळ ५० लाखांपेक्षा अधिक कर्ज दिले जाते असे सांगून बाहेर काढण्यात आले. वरील उदाहरणे प्रातिनिधीक स्वरूपात असून सर्व सरकारी बँकांमध्ये कमी अधिक प्रमाणात असेच अनुभव आहेत. पात्र असूनही आणि कर्ज मंजूर झाले असतानाही फेरीवाल्यांना दिली जाणारी वागणूक निषेधार्ह असून यामुळे फेरीवाल्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे याची दखल घ्यावी असे जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी सांगितले.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्यांचे होणारे हाल पाहून हे पॅकेज दिलेले असताना बँकांचे अधिकारी जर त्याचा लाभ गरजूंना मिळून देत नसतील तर हे अत्यंत संतापजनक आहे व त्यामुळे सामान्य नागरिकांत विनाकारण मोदी सरकार बाबत गैरसमज निर्माण होत आहेत. बँकांच्या कामकाजात सुधारणा झालीच पाहिजे असे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले. तसेच अग्रणी बँकेच्या व्यव्स्थापकांनी त्वरीत कोल्हापूरातील सर्व बँक व्यव्स्थापकांची बैठक घेऊन त्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेची प्राधान्यांने अंमलबजावणी करण्यासाठी कडक शब्दात समज द्यावी अशी आग्रही मागणी केली. यानंतरही एका आठवड्यात पात्र लाभार्थ्यांना दिली जाणारी वागणूक बदलली नाही तर भाजपा प्रत्येक बँकेच्या शाखेवर जाऊन त्याचा जाब विचारेल याची दखल घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
यावर उत्तर देताना आग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहूल माने यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांशी सहमत असल्याचे नमूद करून जनसामान्यांसाठीची योजना त्यांच्या पर्यंत पोचवण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगीतले. शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व तक्रारी या संबंधीत बॅंका पर्यंत पोहचवू व सर्व मुद्यांचे एकत्रित पत्रक काढून सर्व शाखा व्यव्स्थापकांना त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देऊ असे सांगितले. तसेच अधिकाधिक फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा याकरीता कार्यकर्त्यानी सहकार्य करावे अशी विनंतीही केली.
कोल्हापूर शहरातील सुमारे ८ हजार फेरीवाल्यांपैकी केवळ २३०० फेरीवाल्यांनीच या योजनेत अर्ज केले आहेत. त्यामुळे अधिकाधिक फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच या योजनेबाबत बँका अडवणूक करत असल्यास भारतीय जनता पार्टी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, अशोक लोहार, नजीर देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply