स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या शूटिंगला सुरुवात

 

स्टार प्रवाह वाहिनीवर २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. नुकतंच कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेच्या शूटिंगला प्रारंभ झाला. या खास प्रसंगी ई पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. या अनोख्या पत्रकार परिषदेसाठी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे, सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लोकदैवतांचे अभ्यासक डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे आणि कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापिक संचालक संजय पाटील उपस्थित होते.दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं असून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे. सरकारी सुचनाचं काटेकोरपणे पालन करत मालिकेचं शूटिंग केलं जाणार आहे.या मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाह प्रस्तुत दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका अभ्यासपूर्वक बनवली जात आहे. आपल्या रसिकांपर्यंत प्रामाणिक मनोरंजनाद्वारे त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहित असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. भाविक आवर्जून ही मालिका बघतील, आणि त्यांना आपल्या लाडक्या ज्योतिबाची मालिका आणि त्यांचा महिमा घरबसल्या पहाता येईल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!