
कागल:कोरोनातून मी पूर्णता बरा झालो आहे. तुम्हीही सुखरूप रहा, असा काळजीपूर्वक सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध आजारांच्या रुग्णांना फोनवरून दिला. कोरोणाच्या या माहामारीत कोरोणासह इतर आजारांपासून बचावासाठी घरीच रहा, गर्दी टाळा, मास्क वापरा व स्वच्छता पाळा असा संदेशही त्यांनी दिला. कागल पंचायत समितीमध्ये सुरू केलेल्या वैद्यकीय हेल्पलाइन केंद्रावरून श्री. मुश्रीफ यांनी स्वतः फोन करीत रुग्णांशी संवाद साधला व उद्घाटन केले. या केंद्रामधून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, कर्करोग इत्यादी विविध आजारांच्या रुग्णांना दररोज सरासरी २०० कॉल केले जाणार आहेत.यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम अभिनव व अत्यंत लोकोपयोगी आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्यातील हा पहिला व एकमेव उपक्रम आहे. कोरोनाने झालेल्या एकूण मृत्यु पैकी ६० ते ६५ टक्के मृत्यू हे इतर व्याधीग्रस्तांचे आहेत. त्यामुळे इतर व्याधिग्रस्तांनी खबरदारीने राहणे महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या अभ्यासानुसार अद्यापही ७० टक्केच लोक मास्क वापरत आहेत. १०० टक्के लोकांनी मास्क वापरल्यास कोरोनाचा कहर अजूनही कमी होईल.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सभापती सौ. पुनम राहुल मगदूम- महाडिक, उपसभापती दिपक सोनार, माजी उपसभापती विजय भोसले, माजी उपसभापती रमेश तोडकर, सदस्य जयदीप पोवार, सौ. रुपाली सुतार, राजेंद्र माने, शशिकांत खोत, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आदी प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply