
कोल्हापूर :देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला.कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्कृष्ठ उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री या मोहिमेचा प्रारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला. याबाबत अधिक माहिती अशी, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये १२,१०० इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल म्हणाले, अमेझॉन या डिजीटल विक्री बाजारपेठ संकेतस्थळावर महिला स्वयंसहाय्यता गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होवून ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची संकल्पना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विचारातून साकारण्यात येत आहे. आज कोल्हापूर जिल्हयातील प्रसिध्द असलेले कोल्हापूरी चप्पल ऑनलाईन लिंकवरून उत्पादन विक्रीसाठी खुले करण्यात आले. कोल्हापूरी गुळ, काकवी, व्हाईट मेटल ज्वलरी, कोल्हापूरी दागिने, मध, विविध प्रकारचे
मसाले, कोल्हापूरी कांदा व लसुन चटणी, मिरची पावडर, गारमेंट प्रोडक्ट,मास्क, इत्यादी अनेक वस्तू अमेझॉन या संकेतस्थळावर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी आदी उपस्थित होते.
Leave a Reply