जलयुक्त शिवारमध्ये दहा हजार कोटींचा गैरव्यवहार: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 
कोल्हापूर:भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत सरकारच्या दहा हजार कोटी निधीवर डल्ला मारल्याचे स्पष्ट निरीक्षण कॅगच्या  अहवालात नोंदविले आहे. या अभियानामुळे गावागावातील पाण्याची पातळी तर वाढलीच नाही. परंतु, भ्रष्टाचार मात्र जोरात झाला आहे,  असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या अभियानाची खुली चौकशी तर होणारच आहे. तसेच,  गेल्या पाच वर्षात हायब्रीडॲन्युटी योजनेंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, भाजप सरकारने एकेका प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता ही मूळ किमतीच्या ९०० टक्के, ७०० टक्के, ६०० टक्के, ५०० टक्के एवढी वाढवून दाखवली आहे. या सगळ्या  प्रकल्पांमधील गैरव्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे. जलयुक्त शिवार पूर्ण झाल्यानंतर गावा गावातील पाण्याची पातळी वाढणे हा महत्त्वाचा हेतू होता. परंतु; कॅगने असं स्पष्ट निरीक्षण नोंदवलय की शिवारात पाण्याची पातळी तर वाढलीच नाही.  प्रकल्पात भ्रष्टाचार मात्र जोरात झालाय.मंत्री श्री. पुढे म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जलशिवार योजनेमध्ये लोकसहभाग होता म्हणून सांगू लागलेत. ती गोष्ट वेगळी आहे. परंतु; शासनाच्या दहा हजार कोटी निधीवर डल्ला मारला,  असा गंभीर अहवाल कॅगने  दिला. त्यामुळेच मंत्रिमंडळाने या अभियानाची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. वास्तविक; असे अनेक प्रकल्प आहेत त्यांची चौकशी करण्याची गरज आहे.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मंत्री पदाबाबत मी सतत म्हणत होतो, की ते फार भाग्यवान नेते आहेत, त्यांच्याकडे एवढी महत्त्वाची खाती आणि जबाबदारी आहे. परंतु त्यांच्या पाच वर्षाच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला तर सोडाच, कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झाला नाही. कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला कृष्णखोरे लवादाप्रमाणे १३  ते १४ टीएमसी पाणी अडविणे अपेक्षित होते. परंतु पाच वर्षात एक थेंबही पाणी अडविले नाही.सत्ताधारी हे राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधक करीत असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आमचे सरकार सुडभावनेने काम करणारे नाही. कॅगचा रिपोर्ट आल्यामुळेच हा विषय पुढे आला आहे. आमच्या सरकारने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांच्याही साखर कारखान्यांना ५०० कोटी रुपयांची थकहमी दिल्याचे सांगताना श्री. मुश्रीफ म्हणाले, सगळ्याच शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप व्हावे एवढीच आमची भावना आहे. भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर असते तर अश्या थकहमीमध्ये आमचे कारखाने आले असते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम योजनेतील अनियमितता प्रकरणी अहवाल आला असून आठवडाभरात दोषींवर कारवाई होईल, असे ते म्हणाले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!