
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शिष्टमंडळाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांना चिनी वस्तूंची विक्री करू नये याबाबत निवेदन देण्यात आले.पाकिस्तान प्रमाणे भारत देशाच्या सीमेवर सतत कुरापती करणा-या चीनविरोधात भारतात संतापाची भावना आहे. भारतीय सेना चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सदैव सज्ज आहे. भारतीय बाजार चिनी उत्पादनांनी व्यापून गेलेला आहे. स्वयंपाक घरापासून-बेडरूम पर्यंत, मोबाईल, फॅन, एसी पासून ते पेटीएम सारख्या डिजीटल वॉलेट पर्यंत असंख्य चिनी वस्तू बाजारात पदोपदी दिसून येतात. भारत देशात सर्वत्र दसरा आणि दिवाळी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. या सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणावर चीनी वस्तू विक्रीसाठी येत असतात. बाजारातील इतर वस्तूंपेक्षा चिनी वस्तू स्वस्त असल्याने ग्राहकांचा या वस्तू खरेदी करण्यावर भर जास्त असतो. मात्र अशा वस्तू स्वस्तात विकून चीनने भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष केले आहे. आपण भारतीय बनावटीच्या वस्तू विकण्यास प्राधान्य दिल्यास ‘वोकल फॉर लोकल’ या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या घोषणेने देशातील पैसा देशातच राहील व आपला स्थानिक घरगुती वस्तू उत्पादन करणारी व्यक्ती सुद्धा आर्थिकदृष्ट्या सधन होईल. या पार्श्वभूमीवर चीनचे व्यापारी अतिक्रमण रोखण्याच्या हेतूने आपण सर्व व्यापारी व नागरीक यांनी एकत्र येऊन चीन उत्पादीत वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार घालून चीनची आर्थिक कोंडी करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणून स्वदेशी वस्तुंना प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली.
Leave a Reply