
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ येत्या 15 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने आज महानगरपालिकेवर पंचनामा मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा सी पी आर मार्गे महानगरपालिकेसमोर आला. हिशोब द्या, हिशोब द्या, 5 वर्षांच्या कारभाराचा हिशोब द्या अशा पद्धतीच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.घरफाळा घोटाळा, खड्डेमय शहर, रखडलेली थेट पाईपलाईन, बंद पडत चाललेल्या शाळा, बेशिस्त दवाखाने, ढपलेबाज कारभार, शालेय पोषण आहार सेन्ट्रल किचन, घाणेरड्या मुताऱ्या या सर्व मुद्यांच्या कामाचा पंचनामा करून लेखापरीक्षण करावे अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शहरातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. आपल्या प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी हातात फलक धरले होते. रस्ते, गटारी, घरांमध्ये पाणी भरणे, अस्वच्छ पाणी पुरवठा यासारखे प्रलंबित प्रश्न घेऊन नागरिक मोर्चात सामील झाले होते. मोर्चात सामील झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती.यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे,संघटनमंत्री सूरज सुर्वे, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील यांची भाषणे झाली. युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सोबत जोडलेले निवेदन अतिरिक्त आयुक्त/उपायुक्त यांच्याकडे देण्यात आले.यावेळी ‘आप’चे युवा उपाध्यक्ष आदम शेख, विभाग प्रमुख सुभाष यादव, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, बसवराज हदीमनी, महेश घोलपे, शिवाजी मोरे, राजू इंगवले, अभिजित भोसले, विशाल वठारे, धिर्यशिल शिंदे, लखन काझी, सुमित वैद्य, दत्तात्रय सुतार, प्रा. अमित पाटील, गिरीष पाटील,गणेश सकटे, राजेंद्र पाटील, अरुण राऊत,सुदर्शन तुलसे, विशाल सुतार, , लाला बिरजे, रमेश कांबळे, वैशाली कदम, संपदा मुळेकर, नीता पडळकर, गीतांजली डोंब, सुनील औंदकर, प्रशांत अवघडे उपस्थित होते.तसेच जिल्हा कमिटी सदस्य जयवंत पोवार, शरद पाटील, बाळासो जाधव, कृष्णात काणेकर, भिकाजी कांबळे, सुरेश पाटील यांनी सहभाग नोंदवला.कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे अनेक विकासकामे व सेवा पुरवण्याचे काम होते. मागील 5 वर्षांपासून महापालिकेचे विद्यमान सभागृह अस्तित्वात आहे. या सभागृहाच्या कार्यकाळात काही नविन कामे सुरू करण्यात आली तर काही जुनी कामे पुढे नेण्यात आली. परंतु महानगरपालिकेच्या अनेक विभागांच्या गैरकारभारामुळे खालील नमूद मुद्द्यांमुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने आम आदमी पार्टी आपल्याकडे खालील कामांचे लेखा परिक्षण करण्याची मागणी करीत आहे.घरफाळा घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. सॉफ्टवेअरच्या कोड मध्ये बदल, खोट्या पावत्या, अव्यवहार्य व बेकायदेशीर तडजोडीमुळे यामुळे वर्षानुवर्षे हा घोटाळा महापालिकेत होत आला.17 डिसेंबर 2011 रोजी महापालिकेच्या स्थायी समितीला सादर झालेल्या अहवालात घरफाळ्यात 73 कोटींची तूट असल्याचे सांगितले गेले. परंतु ही तूट का व कोणत्या कारणामुळे आली हे सांगण्यात आले नाही. पुढे 9 वर्षांनंतर महापालिकेला सादर झालेल्या अहवालात हा एकूण 3 कोटी 18 लाखांचा घोटाळा असल्याच्या तक्रारी आल्या. घोटाळ्यातील वरच्या पैशाला जबाबदार कोण असा प्रश्न या आकड्यांवरून समोर येतो. मॉल, शॉपिंग सेंटर्स आणि मोठ्या इमारतींना बेकायदेशीर सूट देऊन मोठ्या प्रमाणात यामध्ये ढपला पाडण्यात आला.या अनुषंगाने संपूर्ण घरफाळा विभागाच्या कामाचे, म्हणजेच आवक-जावक, भरणा व आजपर्यंत या विभागात काम केलेल्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्या कारभाराचे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे.आय आर बी विकास प्रकल्प, नगरोथान यासारख्या योजनांच्या माध्यमातून रस्त्यांचा विकास करण्यात आला. यामधील बहुतांश रस्ते दर्जाहीन असल्यामुळे रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. या रस्त्यांच्या कामाचे तज्ज्ञांकडून लेखापरीक्षण करण्यात यावे.कोल्हापुरची एक वेगळी ओळख जगभरात आहे. ती राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणामुळे. पण त्याच कोल्हापुर महानगरपालिकेच्या शाळा दिवसेंदिवस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तेथे सुविधांचा वानवा आहे, पटसंख्या कमी होत चालली आहे. शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. या शाळांच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्यात यावे.महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था ही सामान्य माणसाला धीर देणारी होती. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या दवाखान्यांचा दर्जा अत्यंत खालावला आहे. यामुळे नाईलाजाने नागरिकांना कर्जे काढून खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. महापालिकेच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे लेखापरीक्षण करण्यात यावे.कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनची चर्चा, प्रस्ताव आणि मंजुरीला आता 10 वर्षे उलटून गेली. तरीसुद्धा नागरिकांना त्या पाईपलाईन पासून पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. कामाची प्रगती पाहून केंद्राने यावर खर्च होणार निधी देखील कमी केला. थेट पाईपलाईनच्या या सर्व कामकाजाचे लेखापरीक्षण करण्यात यावे.भ्रष्टाचार करणे, एखाद्या मंजुरीसाठी लाच घेणे, ठेक्याच्या कामावर कमिशन घेणे याला कोल्हापुरी भाषेत समांतर ओळ म्हणजे ढपला पाडणे. महापालिकेने हाती घेतलेले कित्येक प्रकल्प अर्धवट राहिले आहेत अथवा बंद पडले आहेत. या अर्धवट राहिलेल्या सर्व उपक्रमांमधील भ्रष्टाचारामुळे म्हणजेच ढपलेबाज कारभारामुळे या प्रकल्पांचा बोजवारा उडाला. या सर्व उपक्रमांचे/प्रकल्पांच्या कामाचे लेखापरीक्षण करावे.शालेय पोषण आहाराचे काम सेंट्रल किचनच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला. यासाठी 2000 मुलांचा एक गट करण्यात आला, आणि फक्त 7 टेंडर्सद्वारे हे काम देण्यात आले. जर हेच गट 500 मुलांचे केल्यास जवळपास 100 महिला बचत गटांना काम मिळेल. चुकीचे कागदपत्रे जोडलेल्या, अन्न शिजवण्याचा परवाना नसलेल्यांना ठेके देण्यात आले. या सर्व गैरकारभाराचे लेखापरीक्षण करण्यात यावे.शहरातील सर्व मुताऱ्या अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत आहेत. महिला स्वच्छतागृहांचा कुठेही सोय नाही. काही ठिकाणी तर मुताऱ्या गायब झाल्या आहेत. यासर्व स्वच्छतागृहांच्या अवस्थेचे लेखापरीक्षण करण्यात यावे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येणे गरजेचे आहे. लोकांच्या गरजा सुसह्य करणे यासाठी व्यवस्था बसवणे गरजेचे आहे. आपल्या करभरामधील त्रुटी शोधणे, यावर सुधार सुचवणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच वरील नमूद बाबींचे, संबंधित विभागाच्या कामाचे प्रामाणीक व विश्वासू ऑडिटर्स कडून लेखापरीक्षण करणे गरजेचे असून त्याची ताबडतोब सुरुवात करावी.या गैरकारभाराची व्याप्ती पाहता 15 दिवसात ऑडिटर्स नेमावेत. तसेच लेखापरिक्षणाचे अहवाल महापालिकेपुरते न ठेवता सर्वसामान्यांसाठी खुले करावे अशी मागणी करण्यात आली.
Leave a Reply