
कोल्हापूर: लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ व्हावे, या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. या रॅलीमध्ये संघटना आपली वाहनं घेऊन सहभागी झाल्याने या मोर्चाला भव्य रूप मिळालं.
गांधी मैदानपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून महामार्गावर पोहचली. त्यानंतर तावडे हॉटेलमार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली निघाली. लॉकडाउनच्या दरम्यान अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. रिक्षा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे या काळातील वीजबिल माफ करावीत अशा पद्धतीची मागणी कोल्हापुरात जोर धरून आहे.
कोल्हापुरात याआधी देखील वीज बिलांच्या विरोधात अनेक आंदोलने केली. मात्र, सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता या वीजबिलांच्या विरोधात भव्य रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चानंतर देखील जर सरकारने वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याचा इशारा उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाची दखल ही घ्यावीच लागते. नाही तर कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही तसेच हा लढा आता सुरूच राहणार आहे असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
Leave a Reply