खासदार संभाजीराजे छत्रपती यांची रायगड किल्ल्यास भेट

 

रायगड : विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज रायगड किल्ल्यास भेट दिली. सुरूवातीस रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी करून काही सूचना दिल्या. यानंतर हत्ती खान्यानजीक प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, महावितरण, बांधकाम विभाग व MTDC चे अधिकारी यांचेसोबत बैठक घेऊन कामांसदर्भात माहिती घेतली व सध्या सुरू असलेली कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी राजसदरेवर महाराजांना अभिवादन केल्यानंतर सदरेवरील बँरिकेटस् चा विषय चर्चेस येताच संभाजीराजे यांनी उपस्थित पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ निर्णय घेत सदरेवरील बँरिकेटस् हटवून शिवभक्तांना राजसदरेवर प्रवेश खुला केला. यावेळी संभाजीराजे यांनी शिवभक्तांना राजसदरेवर येत असताना काही शिष्टाचार पाळण्याचे आवाहन केले, जसे की सदरेवर डाव्या बाजूने यावे व उजवीकडून उतरावे, तख्ताच्या जागेवर जाऊ नये, सेल्फी घेऊ नये व सदरेवर शांतता पाळावी. हे मार्गदर्शक नियम संभाजीराजेंनी यावेळी सांगितले. तूर्तास हे बँरिकेटस् तख्ताच्या बाजूने लावले असून लवकरच याऐवजी ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल असे संभाजीराजेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खासदार संभाजीराजेंच्या या निर्णयानंतर उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.गडावर प्राधिकरण व पुरात्तव विभागामार्फत सुरु असलेल्या जगदीश्वर मंदिरा च्या डाव्या बाजूला होत असलेल्या उत्खनन जागांची सविस्तर माहिती घेतली व सापडलेल्या वास्तुशास्त्रीय बाबीही समजून घेतल्या. त्यानंतर प्राधिकरणातर्फे होत असलेल्या जगदीश्वर मंदिर फरसबंदीची ही पाहणी करण्यात आली.
यानंतर गडावर सुरु असलेल्या भूमिगत इलेक्ट्रिकल केबल च्या कामांची पहाणी केली तसेच हत्ती तलावाची पाहणी करून गडउतार होत असताना नाना दरवाजामार्गे उतरत तिथे सुरू असलेल्या पायरीमार्ग कामाची पाहणी केली, गडावर पडणाऱ्या पाऊसाचा विचार करता शिवकाळात  नाणेदरवाजावर पाण्याच्या प्रवाहाचा  दाब येऊ नये, यासाठी शिवकाळात रचनाबंध  असणाऱ्या  गटर्सची पाहणी करुन, त्यांचा सध्या वापर करता येऊ शकतो का यावर विचारविनिमय करण्यात आला.
सध्या गडावर सुरू असलेली कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!