लसीकरण केंद्रावरील आरेरावी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्ती करा : भाजपची मागणी 

 

कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर काल एका माजी नगरसेवकांने व त्याच्यासोबत काही लोकांनी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधीतांवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना निवेदन सदर केले.  याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, सध्या कोल्हापूर शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रावरील अनिश्चितता, अस्पष्टता यामुळे सर्वसामान्य लस घेणारा नागरिक संभ्रमावस्थेत आहे. लस घेण्यासाठी नागरिक सकाळी ६ वाजले पासून केंद्रावर थांबून असतात. त्यातच वशिलेबाजी आणि दबावतंत्र यामुळे नियमाने लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यास येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत त्यातूनच अशा केंद्रावर हातघाईचे प्रसंग उद्बभवत आहेत. काल सर्व लसिकरण केंद्रावर केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस मिळणार होती, परंतु संबंधित माजी नगरसेवक हे नोंदणी केलेल्या नागरिकांना थांबवून आपल्या जवळच्या नागरिकांना लस देण्याचा आग्रह करत होते व त्यातूनच त्यांनी व इतर नागरिकांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली. लसीकरण केंद्रावर अशा पद्धतीच्या घटना होणे ही गंभीर गोष्ट असून भारतीय जनता पार्टी या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. वास्तविक पाहता ज्यांनी समाजापुढे शिस्तीचा आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे अशा वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तीने असा प्रकार करणे निंदनीय आहे. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचा पूर्ण पारदर्शकतेने तपास होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी भारतीय जनता पार्टीच्यावतीने  मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!