
रायगड: विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडास भेट देऊन गडावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.कोल्हापूर येथून दु. १२ वाजता संभाजीराजे गडाच्या पायथ्याशी पोहोचले व तिथून नाणे दरवाजा मार्गे पायी गड चढून संभाजीराजे यांनी कामांची पाहणी केली.हिरकणी बुरूजाजवळील श्रीगोंदा टाक्याच्या संवर्धनाचे काम प्राधिकरणाच्या वतीने सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात टाकीतील जवळपास पंधरा फूट गाळ काढण्यात आला आहे. यावेळी टाक्यातील खडकांवर काही विशिष्ट रेषा आढळून आल्या, यावरून या टाक्यातील दगड मुख्यतः गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आले असल्याचे व यामुळे इथे तयार झालेल्या खड्ड्यास नंतर तलावाचे अथवा पाण्याच्या टाक्याचे स्वरूप देण्यात आल्याचे अनुमान प्राधिकरणाच्या तज्ञांनी काढले आहे. याठिकाणी खासदार संभाजीराजे यांनी भेट देऊन या टाक्याचे जतन व संवर्धन अभ्यासकांना पुढील अभ्यासासाठी व संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशापद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.यावेळी, लॉकडाऊन असताना व रोपवे बंद असताना देखील प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग रखरखत्या ऊन्हात दररोज गड पायी चढून येतात व अशा परिस्थितीतही जतन व संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे, याबद्दल संभाजीराजे यांनी प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.याचबरोबर, जिजामाता समाधी परिसर, पाचाड व खर्डी येथील तलावामध्ये रायगड विकास प्राधिकरण व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाचे काम जलदगतीने सुरू आहे. गड उतरल्यानंतर संभाजीराजे यांनी याठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.यावेळी खासदार संभाजीराजे यांच्यासोबत प्राधिकरणाचे वास्तुसंवर्धक वरूण भामरे, विशेष स्थापत्य पथकाचे स्वप्निल बुर्ले यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply