मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल:चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.माथेरान येथील उपनगराध्यक्ष आकाश कन्हैय्या चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर उपस्थित होते. माथेरान नगरपरिषदेत आता भाजपाचे बहुमत झाले आहे. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य थांबलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत आहे. ही मुदत कोरोनामुळे वाढणार नाही व नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या उमेदवारांची सरकारी नोकरीसाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती व नेमणूकपत्र देणे बाकी होते त्यांना ते देण्यातही कोरोनाचा अडसर नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल. कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे, ती लोक सहन करणार नाहीत.ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही, परंतु मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही पक्षाचा बिल्ला आणि बॅनर बाजूला ठेऊन सहभागी होऊ. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे आहे. त्यांनी त्यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजपा पाठिंबा देईल.त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने छत्रपती संभाजीराजे यांचा सन्मान केला आहे. भाजपा कार्यालयात येऊन अर्ज दाखल करावा लागू नये यासाठी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्यानंतर अलाहाबाद येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांनी सत्कार केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेत्यांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता खा. संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो. भाजपाच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली व त्या कामासाठी मोठा निधी दिला. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी पंतप्रधानांना भेट मागितली तरी मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा नसून राज्य सरकारचा आहे हे ध्यानात घ्यायला हवे.ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोविडचे मोठे सावट आहे. त्यामुळे उत्सव न करता कोविडशी संबंधित सेवेचे काम करायचे निर्णय भाजपाने घेतला आहे. त्या दिवशी देशात एक लाख तर महाराष्ट्रात वीस हजार गावात जाऊन पक्षातर्फे सेवाकार्य करण्यात येईल. पक्षातर्फे देशभरात पन्नास हजार बाटल्या रक्तदान करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!