
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी प्रभागनिहाय केंद्र वाढवा, सर्वसामान्य नागरिकांना सहजरित्या लस उपलब्ध झाली पाहिजे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करावे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याबरोबरच तिसरी लाट येऊच नयेत यादृष्टीने प्रशासनाने काम करावे अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या.कोल्हापूर शहरातील कोरोनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण ही महत्वाची उपचारपद्धती आहे. त्यामुळे महापालिकेने लसीकरण केंद्र वाढवावीत. वयोवृध्द, आजारी व अपंग यांना लसीकरणासाठी महापालिकेने वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली होती. त्यानुसार शहरातील प्रभागात दोन लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. अमोल माने यांनी सांगीतले.
लसीकरणासाठी प्रशासनाने नागरिकांची यादी तयार करावी, त्यानुसार त्या नागरिकांना पूर्व सूचना द्यावेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नाही, याची दक्षता घेत. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया महापालिका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.
होम आयसोलेशन बंद करून, कोविड केअर सेंटर वाढवावीत व सर्व रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करावे, अशी सूचना मागील बैठकीत आमदार जाधव यांनी केली होती. त्यानुसार महापालीकेने शहरात तीन कोवीड सेंटर वाढवली असून, महापालीकेच्या कोवीड सेंटरची क्षमता १४०५ झाली आहे. यामध्ये ऑक्सीजनचे ३२४ बेड आहेत. तसेच खासगी कोविड सेंटरमध्ये १७०० बेड आहेत.
भाजी मार्केटमध्ये आजही मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करावे. विक्रेत्यांना बसण्यासाठी पट्टे मारावेत तसेच भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही उभे राहण्यासाठीही पट्टे मारावेत अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.
कोरोनाचे नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे नियम मोडणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करावी अशी सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनास दिल्या.
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ग्रामीण भागातील ४० टक्के भार येत असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगीतले.
कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी शहरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी आणि दुसरी लाट आटोक्यात आणण्याबरोबरच तिसरी लाट येऊच नयेत यादृष्टीने प्रशासनाने काम करावे असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, आरोग्य अधिकारी डाॅ. पोळ, डाॅ.पवार, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी उपस्थित होते.
Leave a Reply