कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे:आम.ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व परिसरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शहरात तसेच गावात प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून यापुढेही कार्यरत राहू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. कोल्हापूर शहर आणि परिसरातील कोरोनाची सद्य स्थिती आणि लसीकरण याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत बोलताना आ. पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये अनेक गावांनी कोव्हीड सेंटर तसेच संस्थात्मक अलगीकरण सेंटर्स सुरु केले आहेत. ग्रामविकास खात्याच्या आदेशानूसार 15 व्या वित्त आयोगातील अबंधित रकमेपैकी 25 टक्के रक्कम कोरोना उपाय योजनांसाठी खर्च करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी दिली आहे. काही गावामध्ये कोव्हीड सेंटर नाही पण जवळच्या गावामध्ये कोव्हीड सेंटर सुरु आहे. या सेंटरमध्ये जवळपासच्या गावातील रुग्ण उपचार घेत असतात. त्यामुळे जवळपासच्या या गावातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातील रक्कम आपल्या भागातील कोव्हीड सेंटर मध्ये खर्च करण्यासाठी परवानगी द्यावी. शहरा शेजारील गावातील लोकांचा शहराशी नोकरी, व्यवसाय व अन्य कामानिमित्त सततचा संपर्क आहे. त्यामुळे या गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन कोरोना संदर्भात उपाययोजना कराव्यात. कोरोना रुग्णांची संख्या व सद्य स्थिती विचारात घेता बरेच रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आढळून येत असून ते गृह अलगीकरणात राहण्यास प्राधान्य देत आहेत. परंतू त्यांच्या घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी शहर तसेच गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढविणेसाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्या मोठ्या गावात रुग्णांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी वॉर्ड निहाय समित्या स्थापन करुन सुक्ष्म नियोजन करावे आदी सुचना आ. पाटील यांनी मांडल्या. या बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, महापालिका आयुक्त‍ निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!