६ जुन “शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘कोल्हापूर हायकर्स’चा विशेष उपक्रम

 

कोल्हापूर: शिवाजी महारांजाचा भव्यदिव्य असा “राज्याभिषेक” सोहळा ६ जून १६७४ रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर संपन्न झाला आणि रयतेला ‘जाणता राजा’ मिळाला.
याच सोहळ्याची आठवण संपूर्ण महाराष्ट्रास राहावी, म्‍हणून गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांच्‍याकडून किल्‍ले रायगडावर सर्व मराठी मावळ्यांच्या साक्षीने या सोहळ्याची झलक संपूर्ण देशाला पाहायला मिळत आहे. यंदाही ३४८ वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्‍या थाटात साजरा होणार आहे. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याला/ शिवभक्ताला रायगडावर पोहोचता आले नाही. यंदाही हेच कोरोनाचे संकट उभे आहे. कोल्हापूर हायकर्सच्यावतीने या सोहळ्यासाठी ट्रेकच्या माध्यमातून विविध ५ ठिकाणांहून पाणी आणण्‍यात आले असून ते पाणी राज्याभिषेककरिता वापरण्यात येणार आहे. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे हे पवित्र जल सुपूर्त करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर, अखिल देशवासियांसाठी प्रेरणेचा आणि अभिमानाचा विषय आहे. दरवर्षी प्रमाणे ६ जूनला रायगडावर छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक मोठ्या थाटा माटात संपन्न होत असतो. या राज्याभिषेकसाठी ६ जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाला यंदा जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथ या महादेव मंदिरातून जल आणले आहे. हे ठिकाण १२ हजार ७३ फूट इतकं उंच आहे. त्यासाठी कोल्हापूर हायकर्सची १९ जणांची टीम दाखल झाली होती. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई (१६४६ फूट) व गंगा नदी. महाराष्ट्रातून कोल्हापूरची राजधानी पन्हाळा, दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या समोर आभाळात झेप घेणारा उत्तुंग सुळका जो आव्हान, साहस आणि थराराचा सुरेख संगम म्हणून ओळखला जातो असा लिंगाणा. अशा या पाच पवित्र ठिकाणांवरून राज्याभिषेकासाठी आम्ही जल आणले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यावर सावट आले असले तरी आम्ही सर्व मिळून नियमांचे पालन करून हा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत आहोत. कोल्हापूर हायकर्स फौंडेशनला कायमस्वरूपी शिवराज्याभिषेकाच्या जलाभिषेकाचे जल आणणेबाबतचा मान दिला असल्यामुळे ही जबाबदारी आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या मोहिमेत अमर शिंदे, तेजश्री भस्मे, अक्षय पाटील, काश्मिरा सावंत, अजिंक्य पाटील, शंकर जाधव, अभी चव्हाण, योगेश सावंत, निनाद कुलकर्णी, शीतल कुलकर्णी, सायली सावंत, इशा जाधव, सविता घुगे, पवन घुगे, अमृत महाडिक, इंद्रजित मोरे, संघवी राजवर्धन, सचिन पाटील, विजय ससे, मुकुंद हावळ, आदी. सहभागी झाले होते.
पत्रकार परिषदेला डॉ.अमर आडके,आर.बी. रावळ, तेजश्री भस्मे,अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!