मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी; चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर:महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण गमावले असून त्याबाबत कॅमेऱ्यांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे आव्हान आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे दोन्ही गमावण्याच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या राज्य सरकारचाच दोष आहे, असे त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत किती बेफिकीरी केली आणि किती दिरंगाई केली हे सर्वोच्च न्यायालयाच्या सुमारे सातशे पानी निकालात पानोपानी दिसते. या विषयावर आपली कागदपत्रांसह जाहीर चर्चेची तयारी आहे.त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत ढिलाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविले. परंतु नंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मागास आयोगाचा आग्रह आहे आणि त्यांना आरक्षणाच्या प्रमाणाचा आधार हवा आहे, ते ही काम महाविकास आघाडी सरकारने केले नाही.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून जनतेचे प्रश्न मार्गी लावले. त्यांनी भाजपाला जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा मंत्र दिला. भाजपा हा संघर्ष कधीच थांबविणार नाही. अन्यायाविरुद्ध आणि वंचितांसाठी भाजपा नेहेमीच संघर्ष करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!