
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासनाने काढलेल्या लॉकडाऊनच्या परिपत्राकानुसार व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. शासनाच्या नवीन परिपत्रकातील चुकीच्या नियमाप्रमाणे या आठवड्यात देखील व्यापार सुरु होवू शकत नाही. परंतू, आता दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा कोल्हापूर चेंबरच्या झालेल्या बैठकीत दिला होता. त्यासंदर्भात आज शिवाजीराव देसाई सभागृहात संलग्न संघटनेच्या प्रतिनीधींची सभा पार पडली. या सभेत दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली. व्यापाऱ्यांनी दुकानात भरलेला माल खराब होत आहे, त्यास बुरशी लागत आहे, कर्मचाऱ्यांचे पगार देणे सध्या शक्य नाही अशा अनेक अडचणींचा सामना व्यापाऱ्यांना करावा लागत आहे. व्यापाऱ्यांच्या भावना सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल अशा तीव्र भावना सर्व संघटनेच्या अध्यक्षांनी मांडल्या. दि. ६ एप्रिल २०२१ पासून अत्यावश्यक व जीवनावश्यक सोडून इतर व्यवसाय बंद आहे. शासनाने काढलेल्या नवीन परिपत्रकाप्रमाणे कोल्हापुरातील फक्त जीवनावश्यक व्यवसायास सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिलेली आहे. नवीन परिपत्राकाप्रमाणे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने कोल्हापुरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर मध्ये शेजारील जिल्ह्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा तसेच कर्नाटकातील अंदाजे २०० ते २५० रुग्ण सेवा घेत आहेत. त्यामुळे कोल्हापुरचा पॉझिटीव्ह रेट लगेच कमी येणे शक्य नाही. हा निर्णय चुकीचा असून रुग्ण संख्या कमी नाही झाली तर आणखी किती दिवस लॉकडाऊन वाढवून सरकार व्यापाऱ्यांना वेठीस धरणार आहे असा सवालही काही व्यापाऱ्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून जीवनावश्यक व अत्यावश्यक सोडून इतर सर्व व्यापार बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या खिशात अथवा बँकेत पैसे शिल्लक नाहीत. बहुतेक व्यापाऱ्यांची जमापुंजी संपलेली आहे. गेल्या दीड वर्षांपासून व्यापारावर फार मोठा परिणाम झालेला असल्याने बहुतेक व्यापाऱ्यांचे भांडवल संपलेले आहे. व्यापाऱ्यांना लाईट बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, जीएसटी, घरफाळा, विम्याचे हप्ते, व्यवसाय परवाना, प्रोफेशनल टॅक्स व शासनाचे इतर कर भरावे लागतात. या सर्वांसाठी व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्याने व्यापाऱ्यांना खाजगी सावकांराकडून सोने, वाहने व इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून व्याजाने पैसे घेणेची वेळ आलेली आहे. व्यापारी दोन महिने घरी बसल्यामुळे त्यांचे शारिरीक व मानसिक संतुलन बिघडलेले आहे. सरकार व्यापाऱ्यांच्या भावनांशी खेळत असून व्यापारामुळे कोरोनाचा फैलाव होतो यास कोणताही शास्त्रीय आधार नाही. तेंव्हा व्यापाराच्या अस्तित्वासाठी लढाई हा एकमेव पर्याय उरला असून सरकारला व्यापाऱ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. त्याप्रमाणे उद्या दि. ९ जून २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत जीवनावश्यक व अत्यावश्यक व्यापार बंद ठेवून सर्व व्यापारी आपापल्या दुकानाबाहेर अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्व व्यापारी रस्त्यावर उतरतील.”
त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देवून व्यवहार चालू असलेल्या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील केमिस्ट असोसिएशन, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय अथणे, किराणा व भुसार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, कोल्हापूर जिल्हा टिंबर असोसिएशनचे सचिव हरिभाई पटेल व कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी आपला व्यवहार बंद ठेवून पाठींबा जाहीर केला.
तसेच कोल्हापूर स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, कोल्हापूर प्लायवूड डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंटस् असोसिएशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, कोल्हापूर कापड व्यापारी संघ, कोल्हापूर रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, रेडीमेड गारमेंट्स असोसिएशन, कोल्हापूर इलेक्ट्रीक असोसिएशन, कोल्हापूर भांडी व्यापारी असोसिएशन, टु व्हिलर स्पेअर पार्टस् असोसिएशन तसेच सर्व औद्योगिक संघटनांनी एकमुखी पाठींबा व्यक्त केला.
यावेळी संजय पाटील, राजू पाटील, आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, भरत ओसवाल विज्ञानंद मुंढे, अजित कोठारी, तौफीक मुल्लाणी, अनिल धडाम, शांताराम सुर्वे, कुलदीप गायकवाड, अरूण सावंत, प्रविण शहा, विक्रम निसार, नितिन मांगलेकर आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
शेवटी चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले.
Leave a Reply