विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत: सुनील घनवट

 

कोल्हापूर: विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी भेट देऊन 12 लोकांना नोटिसा दिल्या आहेत. गेली 17 वर्षे कोणतीच कृती न करणार्‍या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पहाणी करून नोटिसा दिल्या ही एक समाधानाची गोष्ट आहे; मात्र विशाळगडावर वर्ष 1998 पासून मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण पहाता गडावर 64 मोठी आणि नव्याने बांधकाम झालेली 45 हून छोटी अतिक्रमण आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे पुरातत्व खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने हा गड आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आणि तेथील मंदिरे-नरवीरांच्या समाध्या दुर्लक्षित आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने केवळ नोटिसा देण्यावर समाधान न मानता, कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व अतिक्रमणे हटवण्यात यावी, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केली आहे.
माहितीच्या अधिकारात यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार ‘या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकामे झाली आहेत’, असे पुरातत्व खात्यानेच मान्य केले आहे. विशाळगड हा वर्ष 1998 पासून पुरातत्व खात्याकडे असून यातील काही जमीन जरी वनविभागाकडे असली या गडावर होणार्‍या कोणत्याही अतिक्रमणास पुरातत्व विभागाच अंतिमत: जबाबदार आहे. या गडावर मुख्यत्वेकरून रेहानबाबाच्या दर्ग्यासह जी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत, ती काढून टाकण्यासाठी पुरातत्व विभाग काय करणार आहे ? हेही विभागाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. यातातील काही अतिक्रमणे जरी वनविभागाच्या अंतर्गत येत असतील, तरी या दोन्ही विभागांनी समन्वय साधून गडावरील सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासाठी पाठपुरावा घेणे आवश्यक आहे. यापूर्वीही गेल्या 17 वर्षांत पुरातत्व विभागाने अतिक्रमणांना केवळ नोटीस देण्याच्या पलिकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे या वेळेसही केवळ नोटीस देण्यापुरते मर्यादित न रहाता ही संपूर्ण अतिक्रमणे हटवेपर्यंत त्याचा पाठपुरावा घेणे आवश्यक आहे. याच समवेत गडाची ग्रामदेवता असणार्‍या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा, तसेच स्मारके, समाध्या, गडाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणीही या निमित्ताने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!