
कोल्हापूर:शहरातील उपनगररांमधून अनेक नाले, उपनाले व चॅनेल्सद्वारे सांडपाणी वाहून नेण्यात येते. पावसाळा आला की याच ओढ्यांमधून पावसाचे पाणी निर्गत होत असते. परंतु नालेसफाईचा अभाव तसेच ओढ्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात हेच पाणी शेजारील घरांमध्ये शिरते.सम्राटनगर येथील ओढ्यात झालेल्या अनाधिकृत बांधकामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढ्या शेजारील घरांमध्ये पाणी येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. यावर कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मा. नितीन देसाई यांनी पाहणी करून संबंधित ओढ्याची मोजणी करण्याचे निर्देश टाऊन प्लॅनिंग विभागास दिले होते. परंतु यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ओढ्यामध्ये एका अपार्टमेंटची सुरक्षा भिंत (रिटेनिंग वॉल) व बी एस एन एल या सरकारी कार्यालयाने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात रात्री-अपरात्री घरांमध्ये पाणी शिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा संसार दरवर्षी बुडत असल्याचे चित्र आहे.याबाबत एक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने ओढ्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनाची दखल घेत उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे व इतर महापालिका कर्मचारी घटनास्थळी आले. ‘आप’चे संदीप देसाईंनी त्यांना नाल्यात खाली यायला सांगितले. अधिकाऱ्यांनी नाल्यात उतरून अतिक्रमण झालेल्या ठिकाणची पाहणी केली व संबंधित अपार्टमेंट व शासकीय कार्यालयाला नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.ओढ्यातील अतिक्रमणे न काढल्यामुळे जर पुन्हा घरांमध्ये पाणी गेल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर ओढ्यातील पाणी घेऊन बादली मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, मोईन मोकाशी, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर, विजय भोसले, रवी पाटील, विजय हेगडे, भाग्यवंत डाफळे आदी उपस्थित होते.
Leave a Reply