माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने अद्ययावत कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

 

कोल्हापूर:निवडणूकीमध्ये जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवामुळे खचून जाणार्‍यांपैकी महाडिक नाहीत. समाजसेवेचे अखंड व्रत जोपासलेल्या धनंजय महाडिक यांनी हे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करून, सर्वसामान्य रूग्णांची मोठी सोय केलीय. भविष्यात त्यांनी सर्वसामान्य रूग्णांना माफक दरात उपचार देणारे हॉस्पिटल सुरू करावे. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. भाजप- ताराराणी आघाडीच्या सहकार्याने हॉकी स्टेडियम जवळ सुरू केलेल्या १२५ बेडच्या अद्ययावत कोव्हीड सेंटरच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते.
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने कोल्हापूरातील हॉकी स्टेडियम जवळ पाच मजली इमारतीत १२५ बेडचे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. भाजप – ताराराणी आघाडीच्या सहकार्याने आणि महापालिका संचलित या कोव्हीड सेंटरचा लोकार्पण सोहळा, आज संपन्न झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हीड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर उपस्थितांनी कोव्हीड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या समारंभात बोलताना, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी, कोव्हीड सेंटर सुरू करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. राज्यात बहुतांश जिल्हयात कोरोना संसर्गाची लाट ओसरत असली तरी, मात्र कोल्हापुरात अजुनही कोरोना संसर्गाचा जोर कायम आहे. प्रचंड रूग्ण वाढल्याने सीपीआरवर ताण आला आहे. तर खाजगी दवाखान्यात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. ही बाब लक्षात घेवून, आपण हे अद्ययावत आणि सुसज्ज कोव्हीड सेंटर सुरू केले. आता ऑक्सिजन किंवा बेड मिळाला नाही म्हणून एकाही रूग्णाचा मृत्यू होवू नये, यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे महाडिक यांनी सांगितले. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी, कोव्हीड सेंटर सुरू केल्याबद्दल  समाधान व्यक्त केले. महाडिक घराणे आणि लोकसेवा यांचे अतुट नाते आहे. निवडणूकीतील जय – पराजयाचा विचार न करता, महाडिक लोकांच्या मदतीसाठी धावून जातात, ही परंपरा आहे. हॉकी स्टेडियम जवळील हे अद्ययावत कोव्हीड सेंटर, एखाद्या खाजगी हॉस्पिटल प्रमाणे सुसज्ज आणि परिपूर्ण आहे. भविष्यात कोल्हापूरच्या नागरीकांना माफक दरात उपचार मिळण्यासाठी  महाडिकांनी सुसज्ज हॉस्पिटल सुरू करावे, आपण त्याला मदत करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. दरम्यान कोव्हीड काळात समाजाच्या मदतीला धावून जाणार्‍या सर्वसामान्य नागरीक आणि संस्थांच्या प्रेरणादायी कार्यावर २ ते ३ मिनिटाचा माहितीपट बनवून, कोल्हापूरची सामाजिक बांधिलकी राज्यभर पोचवण्याचा मनोदय आमदार पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी बैतुलमाल कमिटीसह आयसोलेशन मधील डॉक्टर आणि विविध आरोग्य केंद्रातील कोव्हीड योध्दयांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव,  माजी नगरसेवक सत्यजीत कदम, सुनील कदम, भगवान काटे, विजय सुर्यवंशी, सुहास लटोरे, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, अमोल पालोजी यांच्यासह भाजप – ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!