
कोल्हापूर: रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेली 35 वर्षे प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश संघवी हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी या वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाची जोड देत आज कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. संघवी यांच्या सामाजिक व वैद्यकीय सेवेचा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे, असे उद्गार माजी खा. धनंजय महाडिक यांनी काढले. कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी शेवटचा श्वास घ्यावा लागला. ही समस्या जाणून घेत कोल्हापुरातील प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी परदेशी बनावटीचे दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनचे आज कोरोना रुग्णांच्या सेवेत माजी खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले प्रतिमिनिट हवेतून सात लिटर ऑक्सिजन संकलित करण्याची क्षमता या उपकरणांची असून त्यांची किंमत एकूण दहा लाख रुपये इतकी आहे. भवानी मंडपातील संघवी हॉस्पिटलमधून गरजू रुग्णांना हे मशीन कोरोना रुग्णांवर औषधोपचार करणार्या डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या शिफारशीवरून आजपासून मोफत उपलब्ध झाले आहे. ज्यांना या उपकरणाची आवश्यकता असेल त्यांनी डॉ. प्रकाश संघवी मोबाईल क्रमांक 9665731000 याच्यावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. प्रकाश संघवी यांनी केले आहे.यावेळी रोटरी गव्हर्नर रो.नासिर बोरसदवाला,ऍड. प्रकाश हिलगे,जैनिश पुनातर,स्नेहल पुनातर,सौ.कल्पना संघवी,डॉ.गणेश खरात आदी उपस्थित होते.
Leave a Reply