गणेशोत्सवावरील निर्बंधांच्या विरोधात ‘आप’ उतरणार

 

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने निर्बंध जाहीर केले. अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे कोल्हापुरातील गणेशोत्सवावर सलग तिसऱ्यावर्षी विरजण पडणार आहे. गणेशोत्सवास अजून काही महिने शिल्लक असताना अशा पद्धतीचे निर्बंध जाहीर केल्याने महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवा संबंधित सर्व घटकांचे मनोधैर्य खचले आहे. राज्य शासनाच्या या निर्बंधांचा आम आदमी पार्टी निषेध करत आहे.सरकारमध्ये असणारे मंत्री गोकुळ निवडणूक व्हावी यासाठी कोर्टात जातात, अर्थमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयाच्या उदघाटनात हजार लोकं जमा होतात, शिवसेनेच्या बडतर्फ मंत्र्यांना मंदिराच्या आवारात शेकडोंची सभा घेताना त्यांना कोरोनाचे भान राहात नाही. मग एकीकडे सरकारचे मंत्रीच नियमांना पायदळी तुडवतात आणि दुसरीकडे गणेशोत्सववर निर्बंध आणतात. स्वतःला सोयीस्कर असे मोठे कार्यक्रम करतात आणि दुसऱ्याला मात्र नियम लावतात. कोल्हापूरची जनता आता हा प्रकार खपवून घेणार नाहीत.गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणून घरगुती गणपतीसाठी 2 फूट आणि सार्वजनिक गणपती 4 फूट असा नियम लावण्यात आले आहे. मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काय संबंध आहे ते कोल्हापुरातील मंत्री जनतेला सांगू शकतील काय? कोरोनाला अटकाव करण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सर्व नागरिकांचे लसीकरण, परंतु कोल्हापूरचे मंत्री जिल्ह्यातील नागरिकांना लस पुरवण्यात अपयशी ठरले आहेत. जे तरुण मंडळे, तालीम संस्था वर्षानुवर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत, अशा तरुणांना ‘भपकेबाज’ म्हणून हिणावणे लाजिरवाणी बाब आहे. मंत्र्यांनी आपली सगळी ताकद वापरून जिल्ह्यासाठी लस पुरवावी, कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे ती लस गल्लोगल्ली पोहोचवतील, लसीकरण मोहिमेत सहकार्य करतील.मागील तीन वर्षांपासून अशाप्रकारची निर्बंधे लादण्याचे काम होत आहे. गणेशोत्सवामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. लाईट-मंडप डेकोरेटर, नारळ, सजावट, फुलवाले यासारखे छोटे व्यापारी या निर्बंधांमुळे अडचणीत येणार आहेत. या निर्बंधांचा सगळ्यात मोठा फटका कुंभारकाम करणाऱ्या मूर्तिकारांना बसणार आहे. या सगळ्या आर्थिक नुकसानाची भरपाई करून देणार का?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा मानसिक तणावातून बाहेर पडण्याचे माध्यम आहे. या निर्बंधांमुळे अनेक वर्षे चालत आलेली मिरावणुकीची परंपरा कायमची संपवण्याचा घाट घातला आहे का? जसे बाकीच्या ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन केले जाते तसे कोल्हापूरच्या मिरवणुकीत करून एक आदर्श निर्माण करता येऊ शकतो.गणेशोत्सवावर लादलेल्या या निर्बंधांच्या विरोधात ‘आपला गणेशोत्सव, आपला लढा’ ही मोहीम आज आम आदमी पार्टी जाहीर करत आहे. या मोहिमेद्वारे कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळे, तालीम संस्थांच्या बैठका घेऊन या निर्बंधांविरोधात रस्त्यावरची व कायदेशीर लढाईची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.या लढाईत आम आदमी पार्टी संबंधित सर्व घटकांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!