
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूरात सीपीआर चौक येथे नानबान फाउंडेशनच्या वतीने पाच रुपयात ‘कोल्हापुरी थाळी’ रोज १२ ते २ या वेळेत मिळणार आहे. तसेच दर बुधवारी आणि रविवारी मांसाहारी थाळी देखील पाच रुपयात कोल्हापूरकरांना मिळणार आहे. कोल्हापूरचे सुपुत्र रवींद्र जाधव यांचे भाऊ अमेरिकेमध्ये नोकरी करतात. त्यांच्या सहकार्याने कोल्हापुरातील काही तरुणांनी कोरोना काळात कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे. चक्क पाच रूपयात भरपेट जेवण कोल्हापूरकरांना मिळणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गरजू, गरीब तसेच हातावरचे पोट असणाऱ्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. दोन वेळच्या जेवणाची त्यांना भ्रांत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापुरी थाळी’ ने त्यांना मोठा आधार दिला आहे. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ येथील उदय प्रभावळे, योगेश भोसले, विशाल जाधव, योगेश पाटील, प्रेम जानवेकर, सोमनाथ प्रभावळे, बाबू प्रभावळे, प्रवीण शिंदे, विजय मांगुरे आणि अतुल कदम यांनी एकत्रित येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. आज या ‘कोल्हापुरी थाळी’ चा शुभारंभ करण्यात आला. रोज २५० थाळी फक्त पाच रुपयात वितरित करण्यात येणार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवकोणताही राजकीय हेतू यामागे नसून फक्त मदत करायची याच हेतूने कोरोना काळात ही ‘कोल्हापुरी थाळी’ कोल्हापुरातल्या काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली आहे. तरी या थाळीचा गरजवंतानी आस्वाद घ्यावा असे आवाहन उदय प्रभावाळे यांनी केले आहे दोन चपात्या, भाजी, आमटी, भात आणि जिलेबी इतके भरपेट आणि रुचकर जेवण कोल्हापूरकरांना फक्त पाच रुपयात मिळणार आहे. सीपीआर चौक येथे ही थाळी दररोज सुरू असणार आहे.
Leave a Reply