
कोल्हापूर: काही दिवसापूर्वी तरुण व होतकरू कलाकार तसेच
प्रसिद्ध ढोलकीपटू व रिदम आर्टिस्ट प्रफुल्ल शेंडगे यांचे अनपेक्षितरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या ४४व्या वर्षी दुःखद निधन झाले त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी कोल्हापुरातील सर्व कलाकारांनी एकत्रित येऊन एक ठराविक रक्कम जमवून त्यांच्या प्रफुल्ल शेंडगे यांची मुलगी आरोही प्रफुल्ल शेंडगे हिच्या नावे नॅशनल बँकेत एफडी स्वरूपात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. या रक्कमेचा तिच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नकार्यासाठी विनियोग व्हावा हा प्रामाणिक उद्देश होता. त्या उद्देशाला धरून तसे आवाहन करण्यात आले. कोल्हापुरातील तसेच रत्नागिरी, पुणे, मुंबई येथील दानशूर तसेच प्रफुल्ल वर प्रेम करणाऱ्या लोकांनी व संस्थांनी पुढे येऊन उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत केली. 25 दिवसात 3 लाख 75 हजार रुपये जमा झाले. त्यापैकी दोन लाख मुलीच्या नावाने किसान विकास पत्र स्वरूपात दहा वर्षे मुदतीसाठी दामदुप्पट योजनेत गुंतवणूक केले आहेत. तर उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबाला दर महिन्याच्या घरखर्चाला मिळतील या पद्धतीने केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यात गुंतवले आहेत.
देवल क्लब येथील भांडारकर कला दालनात शेंडगे कुटुंबियांना ही रक्कम मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. तसेच माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्या हस्ते एफडी च्या पावत्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक डॉ.सुजित मिणचेकर यांनी प्रफुल्ल शेंडगे यांच्या कन्येचे संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी व निराधार योजनेमार्फत पेन्शन देण्याची ग्वाही दिली.सावली केअर सेंटर चे किशोर देशपांडे यांनी शेंडगे यांच्या पत्नीस नोकरी देण्याची ग्वाही दिली.
कोल्हापूर येथील एखाद्या कलाकाराच्या कुटुंबियांना त्याच्या पश्चात एवढी मोठी रक्कम इतक्या कमी दिवसांत जमा करून देण्याची ही पहिलीच घटना आहे. कोल्हापूर च्या कलाकारांनी हानवा आदर्श निर्माण केला आहे.
यासाठी संदेश गावंदे, नितीन सोनटक्के, सुरज नाईक, मेरी आवाज सुनो ग्रुप, सचिन थोरात ख्राइस्ट चर्च के.डी.सी. कवायर ग्रुप, गायक शिक्षक मंचचे राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर, दिनेश माळी फाउंडेशन, म्युझिकली युवर्स, कलांजली परिवार, विरासत फाउंडेशन आणि कॉमर्स कॉलेज तर्फे प्रसाद जमदग्नी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी डॉ.सुजित मिणचेकर,माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, डॉ.अभिजित देवधर, प्रदीप राठोड यांचे योगदान लाभले. यावेळी प्रसाद जमदग्नी, संदेश गावंदे, नितीन सोनटक्के, सुरज नाईक, सचिन थोरात, राजेंद्र कोरे उपस्थित होते.
Leave a Reply