
कोल्हापूर : संसदेच्या चालू अधिवेशन काळात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाम. अमित शहा यांची भेट घेवून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या महापूर व भुस्खलनामुळे जे काही नुकसान झालेले आहे त्याकरीता जास्तीत जास्त पॅकेज द्यावे अशी मागणी केल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. शिवसेनेच्या या शिष्टमंडळामध्ये खासदार विनायक राऊत, खासदार संजय मंडलिक, खासदार राहूल शेवाळे, डॅा. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावीत आदी उपस्थित होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, मुसळधार आणि संततधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहेत. सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्हयाचाही समावेश होत असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेच्या नुकसानीसह विध्वंस व विनाश झाला आहे. यामध्ये भूस्खलनामुळे शेती आणि बागायती पिकांचे नुकसान होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु असून केंद्राने महापुरामुळे प्रभावीत झालेल्या जिल्ह्यांकरीता भरीव पॅकेज द्यावे. याचबरोबर, दरवर्षी महापुरामध्ये NDRF च्या पथकाला पुरपरिस्थितीत बचावकार्यासाठी बोलावावे लागते, NDRF ची टीम पोहचेतोपर्यंत वेळ लागत असलेकारणाने कोणत्याही अडचणीशिवाय अशा संकटाच्यावेळी थोड्या वेळात मदत आणि बचाव कार्य व्हावे याकरीता कोल्हापूर व कोकण विभागात NDRF चे तळ किंवा उपकेंद्र व्हावे अशी मागणी या शिष्टमंडळाने केल्याचे खास.मंडलिक यांनी सांगितले.
Leave a Reply