
कोल्हापूर : कोल्हापूरातील पूरग्रस्तांना नुकसानाची योग्य तितकी भरपाई येत्या दोन आठवड्यात विमा कंपन्यांनी द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधीना दिली.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी रेखावार यांनी आज सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधीची बैठक घेतली.विमा कंपन्या नियमाचा गैरफायदा घेत, पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास अवास्तव कारणे देत आडमुठी भूमिका घेतात, हा २०१९ मधील महापूराचा अनुभव आहे. या वर्षीच्या पूरामध्ये शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेले व्यवसाय, या पुरामध्ये झालेल्या नुकसानामुळे अधिकच संकटात सापडले आहेत. यामुळे विमा कंपन्यांनी सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत बैठक घेऊन, आदेश द्यावेत अशी लेखी सूचना आमदार जाधव यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना दिली होती. त्यानुसार आज बैठक झाली.
यामध्ये जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, सर्व विमा कंपन्यांनी इतर जिल्हयातून सर्वेर बोलवून घ्यावेत व पूरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत. व्यापाऱ्यांनी स्वतः फोटो काढले असतील, व्हिडीओ केले असतील तर ते ग्राह्य धरावेत. अवास्तव कोणतीही कारणे देऊन टाळाटाळ न करता, सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
ज्या ठिकाणी विमा रक्कमेबाबत काही तक्रार असल्यास, तेथे जी रक्कम कंपनीने ठरवली आहे, ती रक्कम तात्काळ विमाधारकांच्या खात्यावर जमा करा व ज्या बद्दल तक्रार आहे त्यावर चर्चेतून मार्ग काढा. कोणतीही सुट्टी न घेता, येत्या दोन आठवडयात सर्व पूरग्रस्तांना नुकसानाची योग्य तितकी भरपाई द्यावी.
आमदार जाधव म्हणाले, विमाधारक व विमा कंपनी यांच्यात कोणताही वाद असेल तर तो सोडवण्यासाठी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा. ज्या विमा कंपनी त्वरित नुकसान भरपाई देते, त्यांच्याकडून यापुढे विमा घ्यावा.
सर्व विमाधारकांना कंपनीने मॅसेज पाठवून सूचना द्याव्यात. सर्वेर कडून तात्काळ रिपोर्ट घ्यावेत. जे सर्वेर रिपोर्ट द्यायला विलंब करतील, त्यांचे परवाने रद्द करावेत व विमा कंपनीने सामाजिक बांधीलकी म्हणून काम करावे अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.विमा घेण्यासाठी, हफ्ता भरण्यासाठी दररोज मॅसेज, कॉल करता तसेच नुकसान भरपाई घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधा असा कॉल, मॅसेज करण्यात अडचण काय आहे अशी विचारणा करीत जिल्हाधिकारी रेखावर यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.संजय शेटे, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे
हरिभाई पटेल, ललित गांधी, अजित कोठारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सुमारे दोन हजार विमाधारकांचे पूरामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्याचे काम तात्काळ पूर्ण करून, त्याचे अहवाल घेण्याचे आव्हान विमा कंपनीसमोर आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेरची बैठक घ्यावी अशी विनंती विमा कंपनी करत होत्या. यावर जिल्हाधिकारी भडकले, सर्वेरची नेमणूक तुम्ही केलाय, तर त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे, असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
Leave a Reply