
पुणे : पंचांग क्षेत्रातील कार्याबद्दल पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांना नुकतेच ‘पंचांगबृहस्पती’ या सर्वश्रेष्ठ उपाधीने गौरविण्यात आले.कर्नाटकातील बेळगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात संकेश्वर(करवीर) पिठाचे २४ वे शंकराचार्य श्री
सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते ही उपाधी, मानपत्र व महावस्त्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आले.काशीचे पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड, धारवाडचे पंडितप्रवर राजेश्वरशास्त्री उप्पिनबेट्टिगिरी, साताऱ्याचे पंडित श्रीकृष्णशास्त्री जोशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.आदि शंकराचार्यांनी चार दिशांना चार पीठे स्थापन केली, त्यातील शृंगेरी हे आद्यपीठ आहे. या शृंगेरी शंकराचार्य पीठावरील १६ वे शंकराचार्य श्री विद्याशंकरभारती यांनी ‘संकेश्वर शंकराचार्य’ पीठाची स्थापना केली. संकेश्वर पीठावर २३ शंकराचार्य होऊन गेले व सांप्रत २४ वे शंकराचार्य ‘श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती’ हे विद्यमान पीठाधीश आहेत.मागील १० वर्षांपासून संगणक अभियंता असलेले पुण्यातील गौरव देशपांडे हे सूर्यसिद्धांत या भारतीय खगोलगणित पद्धतीद्वारे महाराष्ट्रात अचूक व शास्त्रशुद्ध पंचांग निर्मिती करीत आहेत. या पंचांग कार्याबद्दल यापूर्वीही त्यांना शृंगेरी शंकराचार्य, जगन्नाथपुरीचे शंकराचार्य तसेच काशी विद्वत्परिषद इ. तर्फे सन्मानित करण्यात आले आहे हे विशेष. नुकतेच सूर्य सिद्धांतीय देशपांडे पंचांगाच्या संकेतस्थळाचे अर्थात वेबसाईटचे अनावरण देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. या वेळी देशपांडे पंचागाच्या दहाव्या वर्षीच्या छापील आवृत्तीचे अनावरण देखील करण्यात आले.
Leave a Reply