
कोल्हापूर/प्रतिनिधी: कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठी त्याचा ऑलम्पिकमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. ज्यावेळी या खेळाचा समावेश ऑलम्पिक मध्ये होईल त्यावेळी भारताने यात मागे राहून चालणार नाही. तर आत्तापासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे आवश्यक आहे. आणि यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज आहे, अशी अपेक्षा भारतीय कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गोकुळ शिरगाव येथील कबड्डी राव अकॅडमीला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कबड्डी हा खेळ मातीत रुजलेला आहे. याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारने यात सहभागी होऊन आर्थिक निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तरच उत्कृष्ट खेळाडू घडवून आपण ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवू शकतो. माती पासून मॅटपर्यंत असा कबड्डीचा प्रवास आहे. त्यामुळे खेळाडूंना शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देऊन तयार करणे आवश्यक आहे. कोल्हापुरात जिल्हा कबड्डी संघाने याची सुरुवात गेल्या काही वर्षापासून केली असून महाराष्ट्रातील कदाचित ही पहिलीच कबड्डी अकॅडमी असावी जिथे खेळाडूंना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, असेही श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा कबड्डी संघाचे आणि कबड्डी राव अकॅडमीचे अध्यक्ष संभाजी पाटील उपाध्यक्ष, अजित पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडीगिरी, उमा भोसले -भेंडी गिरी,सुभाष पवार आदी उपस्थित होते.
Leave a Reply