मृत्युंजयकारांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल:शैलेश बलकवडे

 

कोल्हापूर  : मराठीतील लोकप्रिय मृत्युंजय कांदबरी लक्ष्मीपुरीच्या पोलिस वसाहतीमध्ये लिहीली गेली याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत आता नव्या स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.सावंत यांच्या स्मृतीदिनी शनिवारी सकाळी येथील लक्ष्मीपुरीतील पोलिस वसाहतीतील ज्या खोलीमध्ये ही कांदबरी लिहीली गेली त्याच ठिकाणी बलकवडे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी बलकवडे बोलत होते. निर्धार प्रतिष्ठान , अक्षर दालन आणि मृत्युंजय प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाचनाची आवड झपाट्याने कमी होत असताना निर्धार प्रतिष्ठानने जाणीवपूर्वक राबवलेल्या अनेक उपक्रमांमधून वाचन संस्कृती वाढेल.
  संजयसिंह चव्हाण म्हणाले, सावंत यांच्या सहवासामध्ये काही वेळ घालण्याची मला संधी मिळाली होती. या कादंबरीमुळे भारावलेल्या पीढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत. त्यांच्या स्मृती जपण्यासाठीचा निर्धारचा उपक्रम अतिशय अनुकरणीय असा आहे. कै. सु. रा. देशपांडे यांनीही कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करून ठेवले आहे याचा मी साक्षीदार आहे.
  सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत निर्धारने अनेकांच्या सहकार्यातून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा समीर देशपांडे यांनी यावेळी घेतला. जिल्हा नियोजन मंडळाच्या ५० लाखांच्या निधीतून आजरा येथे उभारण्यात येत असलेले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याच ठिकाणी सावंत यांच्या स्मृती जपण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशीही अपेक्षा व्यक्त केली.  यावेळी रविंद्र जोशी आणि प्राचार्य जॉन डिसोझा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला राम देशपांडे, कृष्णा दिवटे, युवराज कदम, डा. कविता गगराणी, अमेय जोशी, सुरेश मिरजकर, नारायण बेहेरे, वासिम सरकवास, चंद्रकांत सावंत यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

चौकट:माझ्या करिअरसाठी मृत्युंजय ठरली प्रेरक
बलकवडे म्हणाले, माझे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले. मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आणि झालो पोलिस अधिकारी. परंतू माझ्या युपीएससीच्या आधी मी मृत्युंजय वाचली. त्या काळात माझ्या मनाची व्दिधा अवस्था संपवण्याचे काम या कादंबरीने केले. पुढे वाटचाल करण्यासाठी जी एक मनाची बैठक तयार होण्याची गरज असते ती बैठक तयार करण्याचे काम या कादंबरीने केले. माझ्या करिअरसाठी ही कांदबरी मला प्रेरक ठरली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!