हिंम्मत असेल तर सोमय्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत: सोमवारी कागलमध्ये एकवटणार २५ हजारावर जनता

 

कागल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे घाणेरडे राजकारण आणि निव्वळ स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर किरीट सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कागलमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले. सोमवारी श्री. सोमय्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारो निराधार माता-भगिनी आणि पेशंट कागलमध्ये जमत आहोत. आम्हांला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असेही आव्हान देण्यात आले.केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सोमय्या यांनी जे -जे प्रश्न उपस्थित केलेत. त्या सर्व प्रश्नांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. असे असतानाही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी ? सोमवारी दि. २० सकाळी दहा वाजता कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही पंचवीस ते तीस हजारांहून अधिक जनता जमणार आहोत. आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमय्यांनी पुढे जावे. या माध्यमातून कारखान्याचे ४० हजार सभासद शेतकऱ्यांची ते साखर बंद करु पाहत आहेत. हे कशाचे द्योतक आहे? असा सवालही श्री. माने यांनी केला.बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व संघर्षातून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी झाली आहे. ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी घरातील सोने तारण ठेवून सभासदत्व घेतले आहे. बिनबुडाचे व सनसनाटी आरोप, वक्तव्ये करुन स्टंटबाजी करायची, हा किरीट सोमय्या यांचा छंदच आहे. कदाचित, किरीट सोमय्या यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल. कारण, त्यांनी कोल्हापूरच्या लाल मातीतील हसन मुश्रीफ या रांगड्या पैलवानाशी पंगा घेतलेला आहे. सोमय्या यांचे स्टंटबाजी ची हे दुकान कायमचेच बंद पाडूया, असेही ते म्हणाले.बाचणीचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील म्हणाले, किरीट सोमय्या हे भाजपचे नेते नसून पक्ष संघटनेवर वाढलेले बांडगुळ आहे.माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, योद्धा हरत नाही, त्यावेळी त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रचलेले हे षडयंत्र मोडून काढूया आणि जनतेची ताकद दाखवूया.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश माळी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, प्रवीण काळबर, शशिकांत खोत, शिवानंद माळी, बच्चन कांबळे, रणजीत बन्ने, आनंदराव पसारे, बाबासो नाईक, सागर गुरव, संग्राम गुरव, देवानंद पाटील, नवल बोते, सतीश घाडगे, पंकज खलिफ आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी केले. आभार कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!