
मुंबई:एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतुक करणाऱ्या वाहनांकरिता महाराष्ट्र सरकारने २५ ऑक्टोबर पासून वाहनांच्या नंबरप्लेटसाठी बीएच(भारत) ही नवी मालिका सुरु केली आहे. या नव्या मालिकेमुळे वाहनांना सहजरित्या आंतरराज्य वाहतुक करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी बीएच मालिकेची नोंदणी सुरु करण्याचा शब्द आम्ही दिला होता. यानिमित्ताने, दिलेला शब्द पूर्ण केल्याचे निश्चित समाधान वाटते. यामुळे, दिवाळीमध्ये वाहन नोंदणी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेले प्रोत्साहन आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे भक्कम पाठबळ यामुळे, बीएच (भारत) क्रमांकाची मालिका सुरु करण्यात यश आल्याचेही, ना. पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई येथे ना. पाटील यांच्या हस्ते बीएच (भारत) क्रमांक मालिकेतील राज्यातील पहिले वाहन धारक रोहित सुते यांना वाहन प्रदान करण्यात आले. यावेळी, परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त राजेंद्र मदने व सुते कुटुंबीय उपस्थित होते.
महाराष्ट्रात २५ ऑक्टोबर पासून बीएच ही मालिका सुरु झाली आहे. यामुळे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील प्रवास सुलभ होणार आहे. वाहन नंबर प्लेटवरील बीएच मालिकेमुळे वाहनमालकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज जाता येईल. पूर्वी हा प्रवास करताना नोंदणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. बीएच मालिकेमुळे हा त्रास वाचेल शिवाय ही नोंदणी पद्धत डिजिटल असलयाने वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. मोटर वाहन कायदा 1988 नुसार एका राज्यात नोंदणी केलेली गाडी दुसऱ्या राज्यात बारा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवल्यास नव्याने नोंदणी करावी लागत होती. परंतु बीएच मालिकेमुळे ही किचकट प्रक्रिया आता रद्द झाली आहे.
Leave a Reply