
कोल्हापूर : महराष्ट्रात अन्य कुठल्याही मंदिरात नसलेली आणि ‘केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रमुख मंदिरात’ दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती बंद करावी आणि सर्व भाविकांना मोकळेपणाने देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या ई पास सक्तीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर येथे ई पास ची सक्ती रद्द करा, भाविकांना ई पासच्या बंधनात अडकून ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्रातील झाली मंदिरे खुले परंतु प.म.देवस्थान समितीचा अद्याप अडमुठेपणा का ?, हिंदू धर्मीयांची प्रेरणास्त्रोत असलेली मंदिरे पूर्वीप्रमाणे खुली करा, मंदिरे बंदमुळे छोटे व्यापारी बेहाल – प्रशासन मात्र खुशाल अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कोरोना विळखा कमी झाला असताना सर्व ठिकाणी मंदिरे सुरु झाली परंतु कोल्हापूराच यासाठी वेगळा न्याय काय असा सवाल केला. सरचिटणीस विजय जाधव यांनी ई पासची सक्ती जाचक असल्याचे नमूद करत यामाध्यमातून प्रशासनाला काय सिद्ध करायचे आहे असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर या निर्णयामुळे व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे नमूद केले. सरचिटणीस गणेश देसाई यांनी फक्त हिंदू धर्मियांच्या मंदिरांना ई पासची सक्ती का ? असा सवाल उपस्थित करत प्रशासन हे फक्त आणि फक्त हिंदू धर्मीयांवर अशा पद्धतीची सक्ती करत असल्याचे नमूद केले.
Leave a Reply