
असळज : गेल्या काही वर्षापासून साखर उद्योगाविषयी केंद्र शासनाच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतक-यांस मोठा आर्थिक फटका बसला आहे. अलिकडे अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटाने त्यात आणखी भर घातली आहे. यातून ऊस उत्पादक शेतक-यांची ऊस या पिकाविषयी नकारात्मक भूमिका तयार झाली आहे. साखर उद्योगास गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र शासनाने कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी असा भेदभाव न करता दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा असे प्रतिपादन कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.कारखान्याचे अध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कारखान्याची चालू वर्षाची एफ.आर.पी. प्रति मे टन 2944 रुपये असून हंगामात गळीतास येणा-या ऊसास एकरकमी 2950 रुपये ऊस दर देणार आहे. प्राप्त क्षेत्रात ऊस उत्पादन वाढविणेच्या दृष्टीने गतवर्षी कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत 3 कोटीच्या योजना राबविल्या आहेत. शेतक-यांना बांधावरच सुविधा मिळणेच्यादृष्टीने अनेक निर्णय हाती घेणार आहे. यातून दर हेक्टरी ऊस उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे. सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेत कारखान्याच्यावतीने येथे ऑक्सीजन प्लँट उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. राई ता.राधानगरी येथील धामणी मध्यम प्रकल्प 20 वर्षे रखडला आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी निधीची तरतूदीसाठी प्रयत्नशिल राहू. कारखान्याने उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना जादा दर देणे शक्य होत आहे.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, असंख्य अडचणीवर मात करत डी. वाय. पाटील कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना योग्य दर देत अल्पावधीतच कारखान्याचा लौकीक केला आहे. साखरेचा हमीभाव वाढल्यास शेतक-यांना जादा दर देणे शक्य आहे.यावेळी खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून 19 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार कारखाना संचालकांच्या हस्ते करण्यात आला. 18 गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केलेबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदिप पाटील व सर्व खातेप्रमुखांचा सत्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत संचालक मानसिंग पाटील यांनी केले. सुत्रसंचलन व आभार गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी केले.कार्यक्रमास बजरंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, बी. डी. कोटकर, जयसिंग ठाणेकर, खंडेराव घाटगे, गुलाबराव चव्हाण, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, उदय देसाई, शामराव हंकारे, सिंधुदुर्ग बँकेचे संचालक दिगंबर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, जि. प. सदस्य भगवान पाटील, सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडूरंग भोसले, संजय पडवळ, अभय बोभाटे, शशिकांत खोत, संभाजी पाटणकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, शशिकांत चुयेकर, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्थायी अधिकारी, व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. बंटी पाटील यांनी ठरवलं की करतातच कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत योग्य निर्णय घेऊन जिल्ह्याला वेगळी दिशा देण्याचे काम बंटी पाटील साहेबांनी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून आजतागायत पालकमंत्री बंटी पाटील साहेब हे जे ठरवतात ते करतातच याचा अनुभव आम्हां सर्वांना आला आहे असे खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
Leave a Reply