अभियान कालावधीत पाच लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प

 

पुणे:गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम शासनाचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत ती घरे बांधून हे स्वप्न पूर्ण करावे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महा आवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता दुसऱ्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा आज संकल्प करीत महाराष्ट्राला अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
‘महा आवास अभियान टप्पा-2 चा राज्यस्तरीय शुभारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयातून करण्यात आला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे), ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे आदी उपस्थित होते.
श्री.मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात विविध ग्रामीण आवास योजनांमधून बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यश येत आहे. याचाच भाग म्हणून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान-ग्रामीण (टप्पा-१) मध्ये १२६० पेक्षा जास्त बहुमजली इमारती, ६३० पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच ७५० घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर ५० हजार ११२ भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्पा-१ मध्ये ४ लाख २५ हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!