न्यू कॉलेजमध्ये रंगणार ४१ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी: विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी या युवा महोत्सव आयोजित करण्याचा मान प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस,न्यू कॉलेज यांना मिळालेला आहे. हा ४१ वा युवा महोत्सव न्यू कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिनांक शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या युवा महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे तसेच प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे संचालक वैभवकाका नायकवडी आणि चेअरमन के.जी.पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हा युवा महोत्सव एकूण १४ कला प्रकारांमध्ये होणार असून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून ५६ महाविद्यालये यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
युवा महोत्सवाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात असून न्यू कॉलेजच्या प्रांगणामध्ये एकूण नऊ ठिकाणी हा महोत्सव रंगणार आहे.संपूर्ण जिल्ह्यातून एक हजारहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे संपूर्ण भोजनाची तसेच आवश्यक लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता महाविद्यालय करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑफलाईन युवा महोत्सव होत आहे. कोरोनाचे सर्व नियम या युवा महोत्सवामध्ये पाळण्यात येणार आहेत. दोन डोस झालेले प्रमाणपत्र किंवा ४८ तासांमध्ये आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असेल तरच या युवा महोत्सवामध्ये सहभागी होता येणार आहे. असेही प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांनी सांगितले.
१४ कला प्रकारांमध्ये लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, लघुनाटिका, मूकनाट्य, नकला, भारतीय समूहगीत, सुगम गायन, वक्तृत्व इंग्रजी, वक्तृत्व मराठी, वक्तृत्व हिंदी, वाद-विवाद, एकांकिका आणि पथनाट्य यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ.सागर देशमुख,उपप्राचार्य टी. के.सरगर,प्रा.जी.आर.पाटील,प्रा.अमर सासने,प्रा.डॉ.निलेश पवार,प्रा.किरण तेऊरवाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!