सीपीआरसह वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडवू:केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार

 

कोल्हापूर: गेली दोन वर्षं कोल्हापूर जिल्हा कोरोनाची लढाई लढत आहे. या दरम्यान सीपीआरसह कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आज भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर केली. त्यावर जिल्ह्याचं वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देत, नामदार पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या शनिवारपासून कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. आज नामदार पवार यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सुमारे एक तास त्यांनी महाडिक यांच्याशी जिल्ह्याच्या विविध प्रश्‍नावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत महाडिक यांनी सीपीआरसह कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात कोरोना कालावधीत जाणवलेल्या समस्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यामध्ये सीपीआरमध्ये बदली झालेल्या डॉक्टरांना पुर्ववत सीपीआरमध्ये रूजू करणे, रिक्त असलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या जागा तातडीने भरणे, कॅथलॅब, सिटीस्कॅन, ट्रॉमा केअर, एम.आर.आय.मशीन यासह स्वतंत्र कॅन्सर, बर्न, कोरोना प्रतिबंधक विभागाची निर्मिती करणे, औषध खरेदीसाठी उपलब्ध असणारा अपुरा निधी, ईएसआय हॉस्पिटलची कार्यक्षमता वाढवणे यासह अन्य मुद्यांकडं नामदार भारती पवार यांचे लक्ष वेधले. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आलेल्या भारती पवार यांनी महाडिक यांनी मांडलेल्या सर्व समस्यांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या समस्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी शाल, श्रीफळ, श्री अंबाबाईची मूर्ती आणि भेटवस्तू देऊन, धनंजय महाडिक, मंगल महाडिक, पृथ्वीराज महाडिक यांच्यासह भाजपच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, वैष्णवी महाडिक यांनी मंत्री भारती पवार यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेविका रुपाराणी निकम, अर्चना पागर, माधुरी नकाते, सविता भालकर, कविता माने, उमा इंगळे, सीमा कदम, भाग्यश्री शेटके, स्मिता माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!