
कोल्हापूर:शहरात नागरी समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे . फुटलेले ड्रेनेज, रिस्टोरेशन अभावी रखडलेले रस्ते, वाळून पडलेल्या फांद्यांचा कचरा उठाव, रस्त्यावरील अतिक्रमण यासारख्या समस्यांनी शहरातील नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही.
नगररचना विभागातून फाईली गहाळ होण्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. कार्यालयातून फाईली गायब होतातच कशा असा संतप्त सवाल ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना केला. फाईली गायब होऊ नयेत यासाठी रजिस्टर मेंटेन करावे, एखाद्या ग्रंथालयात व्यवस्था असते अशी व्यवस्था करावी अशी सूचना करण्यात आली. बांधकाम परवानगी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवावी अशीही मागणी करण्यात आली.
नवीन आदेशानुसार छोट्या बांधकाम परवानगीसाठी आर्किटेक्टनी पुढे यावे यासाठी अधिकाऱ्यांनी आर्किटेक्ट यांच्यासोबत संयुक्त बैठक घ्यावी असे निर्देश डॉ. बलकवडे यांनी दिले.महालेखापालांकडून घरफाळा घोटाळ्याच्या ऑडीट, झिरो बिले, इनवॅलीड बिले असणाऱ्या मिळकतींचे नियमितीकरण करून वसुली करण्यासाठी टास्कफोर्स नेमण्यात यावी, यामुळे महापालिकेचे उत्पन्न किमान 35 कोटींनी वाढेल अशी मागणी देसाईंनी केली. अमृत योजनेतून झालेल्या कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन अद्याप झालेले नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल ‘आप’चे युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी अधिकाऱ्यांना केला. यावर डॉ. बलकवडे यांनी सर्व तक्रारी कालबद्ध वेळेत सोडवण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले.नाल्यालागत झालेल्या अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे कुठे पर्यंत आला आहे अशी विचारणा सूरज सुर्वे यांनी केली. यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. रामानंदनगर येथील नाल्यातील बांधकामे हटविण्यास महापालिका दिरंगाई करत आहे असं देसाई म्हणाले. ताराबाई पार्क येथील ड्रेनेजमधील मैलामिश्रित पाणी गटारीतून सोडल्याचे ‘आप’ने समोर आणून दिले होते. ती ड्रेनेजलाईन नवीन टाकण्यासाठी पुरवणी बजेट मंजूर व्हावे अशी मागणी पाटील यांनी केली.बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता अजय साळुंखे, आरोग्यधिकारी प्रकाश पावरा, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी ‘आप’चे संतोष घाटगे, सूरज सुर्वे, किशोर खाडे, राज कोरगावकर, मयूर भोसले, ब्रिजेश पटेल, इम्रान सरगुर, यश भुरुंग, सुधान्शु रुकडीकर, अनिकेत रेंदाळकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply