
मुंबई :कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा या स्टुडीओची जागा भारतरत्न कै.लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. या स्टुडीओतील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वी विकली असून, उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. या फर्मने कायदेशीररित्या खरेदी केली आहे. हा व्यवहार कायदेशीर असला तरी या स्टुडीओबाबत कोल्हापूर वासीयांच्या भावना जोडल्या गेल्या असून, खरेदीदार कंपनीस नियमाप्रमाणे शासनाने पर्यायी जागा द्यावी आणि कोल्हापूरच्या अस्मितेशी निगडीत जयप्रभा स्टुडीओची जागा शासनाने ताब्यात घेवून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्टुडीओचा विकास करावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे. आज मुंबई येथे नगरविकासमंत्री .एकनाथ शिंदे यांची .राजेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. याबाबत नगरविकासमंत्री.एकनाथ शिंदे यांना माहिती देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, जयप्रभा स्टुडीओच्या जागेशी जनभावना जोडल्या गेल्या असून या जागेतील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी पर्यायी जागा स्वीकारून स्टुडीओची जागा शासनाच्या ताब्यात देण्यास सहमती द्यावी, अशा सूचना खरेदीदार कंपनीच्या सर्वच भागीदारांना दिल्या असून, त्यांनी यास सहमती दर्शवित कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे शासकीय नियमाप्रमाणे पर्यायी जागा देवून जागा ताब्यात घेण्याबाबत लेखी मागणी केली आहे. सदर जागेचा समावेश कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने हेरीटेज वास्तू केला आहे. या ठिकाणी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, स्वरसम्राज्ञी कै.लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, अशी समस्त कोल्हापूरवासीयांची इच्छा आहे. मुलांनी हा स्टुडीओ खरेदी करण्यात भागीदारी गुंतवली असली तरी जनभावनाचा आदर करून योग्य त्या सूचना आपण कंपनीच्या सर्वच भागीदारांना दिल्या आहेत. नगरविकास विभागाने नियमाप्रमाणे पर्यायी जागा देवून जयप्रभा स्टुडीओची जागा शासनाने ताब्यात घेवून विकसित करावी, स्टुडीओ विकसित करून, याठिकाणी पूर्ववत चित्रपट निर्मिती स्टुडीओ उपलब्ध करून देवून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी केली. खरेदीदार कंपनीस शासन नियमाप्रमाणे पर्यायी जागा देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून प्रस्ताव महापालिकेस सादर करण्यास त्यांनी सांगितले. यासह जयप्रभा स्टुडीओची जागा कायदेशीररीत्या मुलांच्या भागीदार कंपनीने खरेदी केली असताना या जागेबाबत श्री.राजेश क्षीरसागर यांनी करवीरवासीयांच्या भावना समजून घेवून, जनभावनांचा आदर आणि कलाकारांप्रती असलेली आत्मियता जपून जागा शासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला व पुढाकार घेवून याबाबत पाठपुराव करत असल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. सदर जागा कायदेशीर बाबी तपासून शासन ताब्यात घेण्याबाबत सकारात्मक असेल, तसेच ही जागा शासनाने ताब्यात घेतल्यास भरघोस निधी उपलब्ध करून ही जागा विकसित करून करवीरवासीयांच्या आणि कलाकारांच्या भावना जपून, लवकरच जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न निकाली काढू, असेही नगरविकास मंत्री .एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Leave a Reply