
कोल्हापूर:अर्थसंकल्पाच्या रुपाने आज सर्वात मोठा निर्णय झाला तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी नियमितपणाने कर्ज भरतात. ही संख्या ९२ ते ९५ टक्के आहे. यांना आजवर कधीही कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. कारण; दरवेळी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यामुळे त्यापासून हे वंचितच होते. म्हणूनच ज्या मवेळी महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली, त्यावेळी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले होते. कोरोना महामारीच्या संकटामुळे हे देता आले नव्हते. परंतु; यावर्षीच्या अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात आल्यामुळे सर्वात जास्त लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे.
दरम्यान; आठवड्यापूर्वीच श्री. अंबाबाई मंदिर परिसरात झालेल्या हत्तीमहाल रस्त्यावर एका जाहीर कार्यक्रमात मी म्हणालो होतो, की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५०० कोटींचा अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजूर करून आणू. या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. राहिलेली सर्व कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे आम्ही शासनाकडे आग्रह धरू.
समतेचा संदेश देणार्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त राज्यभर समतेच्या विचारांचा जागर करण्याचे ठरविले आहे. तसेच कोल्हापुरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकही करण्यास आज तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून मी आणि पालकमंत्री सतेज पाटील अतिशय चांगल्या पद्धतीच्या स्मारकाचे नियोजन करून शासनाची मान्यता घेणार आहोत.हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत चांगला अर्थसंकल्प आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सबंध शेतकऱ्यांसाठी , समाजातील सर्व घटकांसाठी हा अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे.
Leave a Reply