
कोल्हापूर : येथील क्रीडाईच्यावतीने दर तीन वर्षांनी दालन हे भव्य प्रदर्शन भरवले जाते. यंदा हे प्रदर्शन ८ ते ११ एप्रिलदरम्यान शाहूपुरी जिमखाना येथे भरवण्यात येणार आहे. बांधकाम विषयक सर्व गोष्टींची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळत असल्याने दर तीन वर्षांनी या प्रदर्शनास प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. क्रीडाईच्या या प्रदर्शनाच्या माहिती संकलनाचे माहिती पुस्तक अनावरण सोहळा नुकताच रेसिडेंसी क्लब येथे पार पडला. श्री महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीज चे प्रमुख जितेंद्र गांधी यांच्या हस्ते याचे प्रकाशन झाले. या प्रदर्शनाविषयी क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले १९९२ साली या प्रदर्शनाची सुरुवात झाली असून यंदाचे हे अकरावे दालन प्रदर्शन आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कोल्हापूर आणि आसपासच्या सर्व ग्राहकांना नवनवीन बांधकाम प्रकल्प, साहित्य आधुनिक उपकरणे व बांधकाम क्षेत्रात घडणाऱ्या विविध घडामोडींची इतंभूत माहिती मिळावी तसेच अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, गृहकर्जे यांची माहिती मिळण्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे, असे दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष प्रकाश देवलापूरकर यांनी सांगितले.
घर हे माणसाच्या आयुष्यातील मोठे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी तसेच इतरांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील ६० नामवंत बिल्डर्स आपले १०० हून अधिक प्रकल्प सादर करणार आहेत. तसेच विविध १५० हून अधिक स्टॉल असणार आहेत.
प्रथमच वातानुकूलित मंडपामध्ये हे दालन प्रदर्शन भरत आहे, असे दालन चे समन्वयक सोमराज देशमुख यांनी सांगितले. यावेळी क्रीडाईचे उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव प्रदीप भारमल, दालन चे उपाध्यक्ष संदीप मिरजकर, खजिनदार गौतम परमार यांच्यासह सदस्य व सभासद उपस्थित होते.
Leave a Reply