किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू: मंत्री हसन मुश्रीफ 

 

करनूर :किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन अशा जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मी तमाम जनतेला जाहीरपणे शपथेवर सांगू इच्छितो की, माझ्या मंत्रीपदाचा गैरवापर करून मिळवलेला एक जरी पैसा किरीट सोमय्या यांनी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू. सगळ्याच यंत्रणांकडून माझी चौकशी केलेली आहे, त्यामधून काहीही हाती लागलेले नाही.माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझ्यावर सात महिन्यापूर्वी तक्रार केली होती, त्यामधून काहीच निष्पन्न झालेले नाही. आज कोल्हापूर विधान उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर ते पुन्हा तक्रार करीत आहेत. निश्चितच हा काही विशेष योगायोग नाही. काही कोल्हापूरची मंडळी, आमची काही कागलची मंडळी यांचे सीडीआर तपासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यामागे निश्चित कोण आहे?जोपर्यंत गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कुणीही माझा केसही वाकडा करू शकत नाही, असे सांगतानाच मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मुद्दही लाख बुरा चाहे, तो क्या होता है? वही होता है, जो मंजुरे खुदा होता है…! गेली ३० -३५ वर्षे सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित व गोरगरीब जनतेचा आशीर्वाद व पाठबळ या जोरावरच मी ही जनकल्याणाची पताका घेऊन चालत आलो आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!