
कोल्हापूर: ईडीची कारवाई हे राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच केली जाते. चुकीचे वर्तन केले तर जरूर कायद्याचा आधार घ्यावा. पण याची एकाची तरी अंतिम चौकशी झाली आहे का? मग काही कारण नसताना ईडीची कारवाई कशासाठी? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी कोल्हापुरात बोलताना केला. नोटाबंदी, जीएसटी, कृषी कायदा हा लोकांना विश्वासात न घेता रेटून केलेले कायदे आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली. सध्या भारताची अर्थव्यवस्थेचा दर हा नीचांकी आहे. त्याला संपूर्णतः भाजप सरकार जबाबदार आहे. भाजपचा गेल्या पाच वर्षाचा महाराष्ट्रातील कारभार म्हणजे फक्त राजकीय कारस्थान होते. आणि केंद्रातील सरकार हे सर्व पाहता भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक हे दोन विचारांची लढाई आहे. प्रतिष्ठेची, स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे. कोल्हापूरकर १२ तारखेला त्यांना त्यांची योग्य जागा दाखवतील.आणि हा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतील. महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलियम वरची एक्साईज ड्युटी सरकार कमी करत नाही. त्यामुळे एकूणच जनता या सरकारला कंटाळलेली आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा तसेच संविधानिक व्यक्तींचा वापर करून भाजपने सरकार पाडण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. परंतु हे सरकार कधीच अस्थिर होणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
Leave a Reply