अग्नीपथ योजनेच्या विरोधासाठी विरोधकांची दलालांशी हातमिळवणी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

 

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगार आणि देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या थेट भरती योजनेमुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहेे. त्यामुळे दुखावलेल्यांना हाताशी धरून राजकीय स्वार्थासाठी देश पेटवायला निघालेल्या विरोधकांना देशातील जनता ओळखून आहे. ही कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया आणि परकीय शक्तींनी पुकारलेले छुपे युद्ध अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांना सिद्ध करणार्‍या अग्नीपथ योजनेस विरोध करण्यासाठी विरोधकांकडून तरूणांची माथी भडकवली जात आहेत. केवळ मोदी द्वेषातून राजकीय विरोधक बेरोजगारीच्या समस्येचे भांडवल करून निष्पाप तरुणांची माथी भडकावत देशाला वेठीस धरत आहेत. तरुणांनी अशा चिथावणीस बळी न पडता या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या उत्कर्षाच्या नव्या संधीचे स्वागत करणे गरजेचे आहे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. या योजनेमुळे देशाच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे. सैनिकी प्रशिक्षणाच्या नव्या महत्वाकांक्षी माध्यमातून भारताच्या संपूर्ण संरक्षण सज्जतेमध्ये युवकांचे महत्वाचे योगदान घडविणारी आणि अशा कुशल तरुणांचा एक मोठा समूह तयार करणारी अग्निपथ ही योजना म्हणजे एक क्रांतीकारी पाऊल आहे, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी अग्निवीर योजनेचे समर्थन केले.
 या योजनेमुळेच तरुणांना सैन्यातील नोकरीबरोबर आपल्या भविष्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गरजेच्या असलेल्या अनेक अतिरिक्त कौशल्यांचे प्रशिक्षणही मिळणार आहे. त्यातून अग्निपथ योजनेत सहभागी होणार्‍या तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे अर्थव्यवस्थेत नव्याने निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकर्‍यांच्या अनेक संधींचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चिथावणीच्या कारस्थानास युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. मोदीद्वेषाने पछाडल्यामुळे केवळ राजकीय विरोधासाठी धंदेवाईक प्रशिक्षकांशी हातमिळवणी करत या योजनेविषयी गैरसमज पसरवून तरुणांची माथी भडकावण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोपही महाडिक यांनी केला. मुळात, चार वर्षांच्या सेवाकाळानंतर मुक्त होणार्‍या तरुणांचे भविष्य असुरक्षित होईल या आक्षेप निरर्थक असून असे प्रशिक्षण घेतलेल्या अग्निवीरांना प्राप्त होणार्‍या कौशल्यामुळे भविष्यातील संधींचा प्राधान्याने फायदा मिळणार आहे. साधारणपणे तरुणांच्या करियरची सुरवातच वयाच्या २०-२२ व्या वर्षानंतर सुरू होत असते. त्याआधी अग्निवीर म्हणून सेवाकाळ पूर्ण केलेल्या तरुणांच्या हाती भविष्य घडविण्यासाठी किमान ११ लाखांची स्वतःची पुंजी आलेली असेल, शिवाय त्यांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांसाठी पॅकेजच्या स्वरूपात अर्थसाह्य मिळणार असल्याने, करिअरच्या सुरुवातीचे आर्थिक अडथळे पार झालेले असतील. ज्यांना सेवाकाळात आपले औपचारिक शिक्षण पूर्ण करावयाचे असेल, त्यांना ती संधी मिळणारच आहे. शिवाय, ही सेवा पूर्ण केल्यानंतर संरक्षण यंत्रणांमधील नोकर्‍यांमध्ये त्यांना प्राधान्याने संधी मिळणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!