तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी :जिल्हाधिकारी

 

कोल्हापूर : तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
 जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमा’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.  यावेळी अल्पसंख्याक विकास महामंडळाअंतर्गत शैक्षणिक कर्ज मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक (जिल्हा विकास) आशुतोष जाधव तसेच विविध विभाग व महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्याप्रकारे करण्यात येत असून याला आणखी गती देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिक, उद्योजक, नवउद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घेवून औद्योगिक क्षेत्रात प्रगती करा. शासकीय विभाग व महामंडळांच्या सहकार्यातून उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!